दर्यापूर (अमरावती) : सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष देऊन बनावट नियुक्ती पत्रावर लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दर्यापूर येथील रहिवासी डॉ. श्रीकांत मंगेश बानुबाकोडे (३२) याच्यासह त्याचा सहकारी देवानंद रमेश अनासाने (रा. मानेवाडा रोड, नागपूर) यांना रामदास पेठ अकोला पोलिसांनी शनिवारी अटक केली.
श्रीकांत बानुवाकोडे याने अकोला येथील लहान उमरी भागात राहणाऱ्या अनूप ज्ञानेश्वर पिंजरकर यांच्यासह अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांची नोकरीचे आमिष देऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे. बानुबाकोडे व त्याच्या सहकाऱ्यांनी बनावट शिक्के तयार करून तरुणांना बँकेत रुजू होण्यासाठी बनावट नियुक्तीपत्रे दिली होती. नियुक्तीपत्र देऊन सदर ठिकाणी रुजू होण्यास गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अनूप पिंजरकर यांनी अकोला येथील रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून डॉ. श्रीकांत बानुबाकोडे याला अमरावती एमआयडीसी परिसरातून, तर देवानंद अनासाने याला नागपूर येथून अटक केली. त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहे.
दोघांनी अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना तलाठी, वनविभाग आणि बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ९ लाख ६० हजार रुपये उकळल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. आरोपीची अधिक चौकशी करून फसवणुकीच्या प्रकरणात अजूनही कुणाचा हात आहे का? हे तपासण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील मीनाक्षी बेलसरे यांनी न्यायालयाला केली होती. त्यानुसार बानुवाकोडे आणि अनासाने यांना २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पीएसआय संदीप मडावी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.