अमरावती: जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयातील पाच जणांनी नांदगाव तालुका खरेदी विक्री संघाची सुमारे १९ लाख ४१ हजार रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार शहर कोतवाली पोलिसांत नोंदविण्यात आली आहे. नांदगाव तालुका खरेदी विक्री समितीचे अध्यक्ष विजय पाटेकर यांच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध बुधवारी कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अशोक देशमुख (६०), गुरूदेव रामगडे, राजेंद्र वाघमारे, के.ए.घटी, आर. आर. गोहने यांचा समावेश आहे. पाचही जण इर्विनचौकस्थित जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. १० ऑक्टोबर २०१७ रोजी हूी फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.अशोक देशमुख, गुरूदेव रामगडे, राजेंद्र वाघमारे यांनी आम्ही दाखल केलेल्या २०१७/१८ च्या स्टॅम्पपेपरवर २०१६/१७ अशी खोडतोड केली. त्यावर तूर खरेदी दाखविली. मात्र, नाफेडमध्ये ती तूर पोहोचलीच नाही. त्यामुळे नांदगाव तालुका खरेदी विक्री संघाची १९. ४१ लाख रुपयांनी फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. सन २०१७/ १८ मध्ये तूर खरेदीला परवानगी मिळाल्याने ती २२ हजार क्विंटल तूर खरेदी करून नाफेडला पाठविण्यात आली. मात्र त्यात ३८४ क्विंटल तूर कमी गेली. हा प्रकार सप्टेंबर २०१९ च्या सप्टेंबरमध्ये पाटकर यांच्या लक्षात आला.
कोट
२०१६/ १७ साली करार केला नसताना, २०१७/१८ च्या कराराच्या स्टॅम्पपेपरवर खोडतोड करून नांदगाव खरेदी विक्री समितीच्या नावे तूर खरेदी दाखविण्यात आली. घटी व गोहने यांनी तो खोटा स्टॅम्पपेपर खरा असल्याचे भासविण्यासाठी त्यावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केल्या, अशा तक्रारीवरून पाच जणांविरूद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला.
नीलिमा आरज
ठाणेदार, शहर कोतवाली.