अमरावती : शैक्षणिक संस्थेतील मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासह तांत्रिक सोई सुविधा तथा ईमारत बांधकामाकरीता २५ कोटी रुपये सीएसआर फंड मिळवून देण्याची बतावणी करून येथील शिक्षणसंस्थाचालकाची सुमारी ३० लाख रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली. २६ ते २९ जूनदरम्यान तो प्रकार घडला. याप्रकरणी विजय टोम्पे (४९, रा. अंबापेठ) यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी २ ऑगस्ट रोजी आरोपी अजाबराव भोंगाडे (५५), सचिन मुंडाने (५०) व गणेश सोनवणे (५५, रा. तिघेही अमरावती) यांच्याविरूध्द फसवणूक व फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला.
सिएसआर फंड मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून आरोपींनी टोम्पे यांचा विश्वास संपादन केला. त्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट लागेल, अशी बतावणी केली. आरोपींनी त्यासाठी टोम्पे यांच्याकडून एकुण ३० लाख रुपये आरजीजीएस व रोख स्वरुपात स्विकारले. त्यानंतर आरोपींनी टोम्पे यांच्या शिक्षण संस्थेच्या नावे दिलीप बिल्डकॉन लि. या कंपनीचा पंजाब नॅशनल बँकेतील खात्याचा बनावट चेक दिला. तो चेक बनावट असल्याचे ज्ञात असूनही संस्थेची आर्थिक फसवणूक करण्याचे उद्देशाने तो त्यांना देण्यात आला.