अंजनगाव सुर्जी (अमरावती) : स्थानिक सुर्जी विभागातील नेताजी चौक येथील कांदा व्यापारी मो. एजाज मो. गुलाब यांची सातारा येथील आरोपीने ट्रक खरेदी व्यवहारात तब्बल १० लाख रुपयांनी फसवणूक केली. या आरोपीचा अंजनगाव पोलीस पथकाने तब्बल तीन दिवस पाठलाग करून अखेर त्याला अटक केली.
पोलीस सूत्रांनुसार, कुणाल अरुण चव्हाण (३२, रा. संभाजीनगर, सातारा) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पुण्याच्या चाकण परिसरातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. ही कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकात उपनिरीक्षक प्रल्हाद पवार, सहायक निरीक्षक नागे, पोलीस कर्मचारी गोपाळ सोळंके, रूपलाल नाकतोडे यांचा समावेश होता. फिर्यादी मो. एजाज हे या पथकाच्या सोबत होते. त्यांनी आरोपीची ओळख पटविली.
फसवणुकीनंतर तब्बल अडीच वर्षे आरोपी रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होता. अखेर मो. एजाज यांनी ठाणेदार दीपक वानखडे यांच्याशी संपर्क करून त्यांना हकीकत सांगितली. वानखडे यांनी सातारा पोलिसांशी सोबत संपर्क करून पथक स्थापन केले. पथकाला गोपनीयता बाळगण्याचा सल्ला देत त्यांनी फक्त सातारा ठाणेदारासोबत संपर्कात राहावयास सांगितले. पथकाने आरोपीचा मागोवा घेतला तेव्हा तो सतत प्रवास करत होता. त्याच्या मोबाइल लोकेशनवरून तब्बल तीन दिवस आरोपीचा पाठलाग करण्यात आला. आरोपीला अंजनगावात आणल्यानंतर न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
रक्कम बुडवणाऱ्याला भरविला घास
मो. एजाज यांची मोठी रक्कम बुडवणारा आरोपी कुणाल चव्हाण याला अटक केल्यावर त्याला एजाज यांनी प्रवासात आग्रहाने जेवू घातले. आपली रक्कम मागे-पुढे येत राहील, पण तू जेवण करून घे, असा आरोपीला म्हटल्याचा पोलिसांनी आवर्जून उल्लेख केला.