अमरावती : शेअर मार्केटमध्ये आभासी नफा दाखवून येथील एका तरुणाची ६.४७ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. २६ मार्च ते १५ मेदरम्यान ती फसवणुकीची मालिका चालली. याप्रकरणी, रवी दुल्हानी (४०, रा. नवीवस्ती,बडनेरा) यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी १६ जुलै रोजी व्हॉट्सॲप ग्रुप युजर, सहा बँक खातेधारक अशा एकूण सात जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
फिर्यादी दुल्हानी यांना २६ मार्च रोजी एका अनोळखी मोबाइल क्रमांकधारकाने एक लिंक पाठविली. त्या लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडून आरोपींनी त्यांना शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यासाठी त्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. आरोपींनी त्यांना शेअर ऑनलाइन ट्रेडिंग करण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या बँकेच्या खात्यांमध्ये ऑनलाइन रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. दुल्हानी यांनी एक्युआर वेल्थ ट्रेनिंग कॅम्प या ॲपमध्ये ती गुंतवणूक केली. त्यांनी पाठविलेल्या एकूण ६ लाख ४७ हजार रुपयांवर नफा झाल्याचे दाखविले. परंतु, नफा म्हणून दाखविलेली रक्कम फिर्यादीला विड्रॉल करता येत नव्हती. तेव्हा त्यांना फसवणुकीची जाणीव झाली. त्यांनी १६ जुुलै रोजी सायबर पोलीस ठाणे गाठले.