आरडीधारकांची फसवणूक : अहवाल तपासणीअंती होणार कारवाईचांदूररेल्वे : पळसखेड येथील टपाल कार्यालयात खातेदाऱ्यांनी आरडीच्या माध्यमातून लाखो रूपये जमा केले. आरडीचा कालावधी पूर्ण झाल्याने ते पैसे घेण्याकरिता पोस्टात गेलेल्या ग्राहकांना पैसे भरलेच नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लाखो रुपयांची अफरातफर झाल्याची तक्रार दोन खातेदारांनी पोलीस विभागाकडे केली आहे. पोलीस विभागाने ही कार्यवाही थंडबस्त्यात टाकल्याने खातेदारांनी पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेटी घेतली. मात्र खात्यात भरलेले पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोस्ट खात्यात भरलेले पैसे मागायचे कुणाला, या विवंचनेत खातेदार अडकले आहेत. पळसखेड येथील खातेदार पोस्टात रक्कम भरण्यासाठी गेले असता पोस्टमन पैसे भरल्याचा शिक्का पुस्तकावर मारून देत होते. ज्यावेळी आरडीचा कालावधी पूर्ण झाला तेव्हा पोस्ट खात्यात आरडीचे पैसे मागण्यासाठी खातेदार गेले. मात्र ''तुमचे पुस्तक अमरावतीला पाठविले, यायचे आहे'' अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे संबंधित खातेदार अमरावतीच्या मुख्य डाक विभागात चौकशीकरिता गेले असता त्यांना रक्कमच जमा नसल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी अफरातफर झाल्याची बाब समोर आली. याबाबत कार्यवाहीच्या भीतीने काही रक्कम पोस्ट विभागात भरण्यात आल्याचेही सांगण्यात आले. परंतु जे खातेदार कधीही गावाच्या बाहेर गेले नाही अशा खातेदारांना अद्यापही रक्कम मिळाली नाही. शेवटी चांदूररेल्वे पोलीस ठाण्यात खातेदारांनी लेखी तक्रार दाखल केली. याबाबत चांदूररेल्वे पोलिसांमार्फत कासवगतीने कार्यवाही होत असल्यामुळे खातेदारांनी वरिष्ठांकडे धाव घेतली. पै-पै भरलेले आरडीचे लाखो रुपये बुडणार का, अशी विचारणा करत असले तरी वरिष्ठांनीही कानावर हात ठेवले. त्यामुळे आरडीधारकांची चिंता वाढली आहे. (तालुका प्रतिनिधी)
पळसखेडच्या डाक कार्यालयात अफरातफर
By admin | Published: November 22, 2015 12:17 AM