अमरावती : जनार्धन हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरचे बांधकाम करून देण्याचा व्यवहार ठरल्यानंतर बांधकाम न करता ९८ हजारांची फसवणूक केल्याची घटना राजकमल चौकात २६ नोव्हेंबर २०२० ते १९ एप्रिल २०२१ दरम्यान घडली. याप्रकरणी गुरुवारी सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
रामावतार साहानी (४०, रा. हैदराबाद), रामरूप साहनी (३०, रा. हैदराबाद) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी नीलेश जनार्दन केचे (३५, रा. जनार्दन हॉस्पिटल राजकमल चौक) यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.
पोलीस सूत्रानुसार, ऑपरेशन थिएटर्सच्या बांधकामाकरिता आरोपीशी २५ लाख रुपये देण्याचे ठरले. तसेच आरोपीला ॲडव्हान्स म्हणून ९८ हजार रुपये दिले. त्यानुसार ऑपरेशन थिएटर्सचे बांधकाम सात दिवसांत करून देण्याचे आरोपीने सांगितले. मात्र, फिर्यादीने आरोपीच्या बँक खात्यात पैसे टाकल्यानंतर फिर्यादीने दोन्ही आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलले नाही. तसेच मेसेज टाकल्यानंतर रिप्लायसुद्धा दिला नाही. आरोपी पाच महिन्यांनंतरही कामावर न आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने तक्रार नोंदविली. आरोपीविरुद्ध भादंविची कलम ४२०, ३४ अन्यवे गुन्हा नोंदविला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल आठवले करीत आहेत.