- अनिल कडू अमरावती- हळद उत्पादक शेतक-यांकडून हळद नेल्यानंतर शेतमालाचे पैसे न मिळाल्यावरून अचलपूरच्या २० शेतक-यांनी अचलपूर शहरातील सरमसपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात १ कोटी ९१ लक्ष रुपयांनी फसवणूक झाल्याचे शेतक-यांनी म्हटले आहे. अतुल साहेबराव लव्हाळे रा. ढंगारखेडा, ता. कारंजा लाड, ह.मु. अमरावतीसह अन्य दोन अशा एकूण तिघांविरुद्ध शेतकºयांनी ही तक्रार दिली आहे. सरमसपुरा पोलीस ठाण्यासह या शेतकºयांनी ही तक्रार जिल्हाधिकाºयांकडे दिली आहे. आमच्याकडून नेलेल्या हळदीचे त्या-त्या वर्षीच्या बाजारभावाप्रमाणे आम्हाला पैसे मिळवून द्यावे आणि न्याय मिळवून द्यावा, असे शेतक-यांनी सादर तक्रारीत म्हटले आहे. लव्हाळे यांनी अचलपूरमधील हळद उत्पादक शेतक-यांच्या गटासोबत चर्चा केली. गटातील शेतक-यांनी सभा घेतली. हळदीला बाजारभावापेक्षाही अधिक ज्यादा भाव देण्याची हमी शेतक-यांना दिली. ज्यादा भाव मिळतो म्हणून आपल्या शेतातील हळद त्याने सुचविल्याप्रमाणे मोजून दिली. पहिल्या टप्प्यात त्याने शेतक-यांना पैसेही दिले. लव्हाळे याने ही हळद व्यापा-याला पुरविल्याचे, विकल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, त्याने नोटबंदीचे कारण पुढे केले. हळद उत्पादक शेतक-यांच्या शेतमालाचे पैसे थांबवलेत. पैसे थांबल्यावरही अचलपूरच्या शेतक-यांनी विश्वासापोटी लव्हाळेला हळद पुरविली. थकलेले पैसे मिळावेत म्हणून शेतक-यांनी त्याच्यासोबत सतत संपर्क साधला. वेळोवेळी भेटी घेतल्या. पैशाची मांगणी केली. पण, त्यांना पैसे मिळाले नाहीत. अखेर त्यांनी जिल्हाधिकारी व सरमसपुरा पोलीस ठाण्याला तक्रार दिली. हळद विक्री व्यवहारात १० शेतक-यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे १ कोटी २६ लाख, शिरखेड पोलिसांत २१ शेतक-यांनी १ कोटी ७३ लाख, कु-हा पोलिसांत २० शेतक-यांनी १ कोटी ९१ लाखांनी फसगत केल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हळद खरेदी विक्री प्रकरणात फसगत झालेल्या शेतक-यांची संख्या दीडशेच्यावर असल्याचे सांगितले जात आहे. अचलपूरच्या शेतक-यांची तक्रार वेगळी आहे. यातील शेतकºयांची स्वत:जवळील रोख पैसे या हळद खेरेदी-विक्री व्यवहारात गुंतलेले नाहीत. गेलेल्या हळदीचेही शेतक-यांनी त्या-त्या वर्षीच्या बाजारभावाने पैसे मागितले आहेत. शिरखेड आणि कु-हा पोलिसात शाखा अभियंता श्रीधर हुशंगाबादे यांच्याविरुद्ध तक्रार असली तरी सरमसपुरा पोलिसांत शेतकºयांनी दिलेल्या तक्रारीत हुशंगाबादेंच्या नावाचा उल्लेख नाही.
जिल्हाधिका-यांना दिलेल्या तक्रारीची प्रत शेतकºयांनी आमच्याकडे दिलेली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. - अभिजित अहिरराव,ठाणेदार, सरमसपुरा