अंजनगाव सुर्जी : शेतातील संत्रा घेऊन गेल्यावर त्याचा मोबदला प्राप्त न झाल्यामुळे धनेगाव येथील शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच पुन्हा येथील एका जिनिंग मालकाने अकोेटच्या कापूस उत्पादक शेतकऱ्याची १० लाख रुपयांनी फसवणूक केली. या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात देऊनसुद्धा आरोपी मोकाट आहेत.
ज्या जिनिंग मालकाने ही फसवणूक केली. तो या कामात सराईत असून यापूर्वीसुद्धा त्याने असे कृत्य केल्याची नोंद आहे. बाजार समितीच्या कायद्यात अशा दलाल, व्यापाऱ्याचे परवाने रद्द करण्याची दंडात्मक तरतूद असली तरीही मूळ शेतकऱ्यांच्या नुकसानाचा प्रश्न कायम आहे. पोलिसांनी मात्र धनादेश अनादरणाची ती तक्रार केवळ चौकशीत ठेवली आहे. याबाबत शेतकरी संघटना सोमवारी तहसीलदारांना निवेदन देणार असल्याची माहिती संघटना प्रमुख मणिकराव मोरे यांनी दिली. हे प्रकरण चौकशीत ठेवण्यात आल्याचे प्रभारी ठाणेदार विशाल पोळकर यांनी सांगितले. पोलिसांनी तात्काळ दंडात्मक कारवाई करून आपले पैसे परत मिळवून द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.