अमरावती : शहरातून तडीपार केल्यानंतरही मुक्तपणे वावरणाऱ्या चार गुंडांना एकाच रात्रीतून पकडण्यात आले. १६ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. समाजस्वास्थ्य चांगले राहावे, यासाठी दोन वर्षांकरिता शहर तथा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले गुंड शहरात, घरात परततात तरी कसे? तडीपार गुंड मुक्तपणे फिरत असताना संबंधित पोलिस ठाण्यातील ‘डीबी’ करते तरी काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे.
शहर गुन्हे शाखेने १६ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ७:४० च्या सुमारास रियाय खान हयात खान (२९, रा. सागरनगर, अमरावती) याला खोलापुरी गेट भागातून अटक केली. १४ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या तडीपार आदेशाचे उल्लंघन करीत तो दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने मुक्तपणे फिरताना आढळून आला. त्याला दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. त्याच दरम्यान सकाळी ७:३० ते ८ च्या दरम्यान लच्छू ऊर्फ शेख इस्राईल वल्द शेख इस्माईल ऊर्फ कल्लू (२८, रा. हैदरपुरा) या तडीपार गुंडालादेखील अटक करण्यात आली.
शहर तथा जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केले असताना ते आदेश डावलून तो गुन्हा करण्याच्या उद्देशाने शहरात प्रवेशला. त्याला खोलापुरी गेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. १६ जानेवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास निखिल काळे (२७, रा. काटआमला) या गुंडाला बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तडीपारीचे आदेश डावलून फिरत असताना अटक करण्यात आली. त्याला १७ जून २०२२ च्या आदेशानुसार शहर तथा जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर १६ जानेवारी रोजी दुपारी ५:१० च्या सुमारास अमर सुखदेव यादव (२२) याला त्याच्या छत्रसाल नगर येथील घरासमोरूनच अटक करण्यात आली. त्याला १९ डिसेंबर २०२२ च्या आदेशाने तडीपार करण्यात आले. गाडगेनगर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध तडीपारी उल्लंघनाचा गुन्हा नोंदविला. एकाच दिवशी या चार कारवाया करण्यात आल्या.
डीबी कशात बिझी?
वास्तविक, ज्या गुंडांना तडीपार करण्यात आले, ते गुंड आदेश डावलून शहरात, घरी येतात का, हे तपासण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्यातील डीबी स्कॉडची असते. मात्र, डीबी पथकाच्या नाकावर टिच्चून कधी नव्हे ते एकाच दिवशी चार तडीपारांना अटक करण्यात शहर गुन्हे शाखेने यश मिळविले. त्यामुळे डीबीची कार्यप्रणाली पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मागे एकदा राजापेठच्या हद्दीत तडीपार आरोपीने स्टेट बँक कॉलनी गाठून दुचाकी चोरली होती. तर फ्रेजरपुऱ्यातील एका तडीपाराने शहर गाठून गायीवर चाकूहल्ला करून तिचा जीव घेतला होता हे विशेष.