अमरावती :गुन्हेगारी कारवाया केल्यामुळे शहरातील अनेक गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. असे असले तरी हे गुन्हेगार बिनधास्तपणे शहरात वावरताना दिसून येतात. त्याअनुषंगाने शहर पोलिसांनी १७ जुलै रोजी राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पाच तडिपारांना ताब्यात घेतले. शहर तथा जिल्ह्यातून तडिपार केल्याचा आदेश डावलून ते पाचही जण मुक्तपणे फिरताना दिसून आले. नागपुरी गेट, राजापेठ, बडनेरा व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ती कारवाई करण्यात आली.
तडीपारीचे आदेश पायदळी तुडविणाऱ्यांमध्ये मोहम्मद बेग रशीद बेग (२४, लालखडी), रोहित कालू कोयत (२५, रा. बेलपुरा), विशाल उर्फ आकाश जगतपाल सोनटक्के (२४, रा. मिलचाळ, नवीवस्ती, बडनेरा), राजेंद्र उर्फ राजू शंकरराव गरूड (४२, अंजनगाव बारी) व समीर सुनिल निकोसे (२९, रा. फ्रेजरपुरा) यांचा समावेश आहे. संबंधित पोलीस ठाण्यात १७ जुलै रोजी पहाटे त्या पाचही जणांविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १४२ नुसार कारवाई करण्यात आली.
पाच जण एकतर घरात किंवा लगतच्या परिसरात मुक्त आढळून आले. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याचा डीबी स्कॉड नेमका करतो तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातून हद्दपार करण्यात आलेले असतानाही या गुन्हेगारांनी पुन्हा शहरामध्ये वास्तव्य केल्याचे दिसून येत आहे. शहर पोलिसांनी ही बाब गंभीर घेतली असून अशा गुन्हेगारांचा शोध घेत कारवाई करण्यात येत आहे.
शहरात राहून पुन्हा गुन्हे
शहर तथा जिल्ह्यातून दोन वर्षे हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींना ते ज्या ठिकाणी म्हणतील त्या गावात वा शहरात सोडण्यात येते. तेथील पोलिस ठाण्यामध्ये त्याने हजेरी देणे बंधनकारक असते. मात्र हे गुन्हेगार काही दिवसातच शहरात दाखल होतात. व पुन्हा गुन्हेगारी कृत्य करीत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी तडीपार केलेल्या एका तडिपाराने चक्क गायीला चाकुने भोसकले होते. केडियानगरमधील एक तडीपार वारंवार शहरात दिसून येतो. तडीपार असताना त्याला वाहनचोरीमध्ये अटक करण्यात आली होती.