कोविड लॉकडाऊनच्या कालावधीत जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने मे महिन्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब रेशनकार्ड योजना मोफत गहू व तांदूळ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेंतर्गत मोर्शी तालुक्यात १३५.५७ मेट्रिक टन धान्य मोफत देण्यात येणार आहे.
अंत्योदय योजनेचे रेशनकार्ड असलेल्या ७ हजार ७४८ शिधापत्रिकाधारकांना प्रतिकार्ड ३५ किलो धान्य देण्यात येते. यात गहू १५ किलो तसेच २० किलो तांदूळ देण्यात येणार आहे. प्राधान्य रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील प्रत्येकाला तीन किलो गहू तर दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहे. त्याचा लाभ तालुक्यातील ९३,२२९ नागरिकांना होणार आहे.
कोरोना लॉकडाऊन काळासाठी माहे मे व जून या महिन्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राबविण्यात येत असून यात ५ किलो प्रमाणे मोफत धान्य दिले जात आहे.
तालुक्यात प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांसाठी १ लाख २३ हजार ७३६ लाभार्थी आहेत. या रेशन कार्डमध्ये नाव असणाऱ्यांना ५ किलोप्रमाणे २,७९६ क्विंटल गहू मिळणार आहे. प्रत्येकी २ किलोप्रमाणे १,८६४ क्विंटल तांदूळ मोफत मिळणार आहे.
अंत्योदय लाभार्थ्यांसाठी ३०,५०७ लाभार्थी आहेत. या रेशन कार्डमध्ये नाव असणाऱ्यांना ५ किलोप्रमाणे ९१५ क्विंटल गहू मिळणार आहे. प्रत्येकी २ किलोप्रमाणे ६१० क्विंटल तांदूळ मोफत मिळणार आहे.
तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी पुढील महिन्यात त्यांचे धान्य रेशन दुकानातून घेऊन जावे. धान्य घेताना सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे. मास्कचा वापर करून धान्य दुकानदारास सहकार्य करावे, असे आवाहन पुरवठा विभागाचे निरीक्षक विलास मुसळे यांनी केले आहे.