मोर्शी : तालुक्यातील मध्यप्रदेश सिमेतील गावांमध्ये राज्य उत्पादन शुल्क तसेच महाराष्ट्र व मध्यप्रदेश पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या धाड टाकून एकूण २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. १२ मे रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
सध्या अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढला असतानादेखील मध्यप्रदेश सीमेवर सर्रास दारू विकली जात आहे. मोर्शी तालुक्यात ग्रामीण भागात बाहेरून दारू पिऊन आलेले गावात वावरतात व धुमाकूळ घालताना दिसत आहे. मोर्शी तालुक्यातील मध्यप्रदेशाच्या सीमेवर आठनेर, अडामपाणी, रोहना, डबका, कुंमुद्रा, झुनकार, सालबर्डी, घोडदेव येथे सुरू असलेल्या अवैध गावठी दारू काढणाऱ्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क अधिकारी एस. के. उराव यांच्या मार्गदर्शनात धाड टाकण्यात येऊन अवैध गावठी दारू गाळणाऱ्या विविध ठिकाणांहून प्लास्टिकचे २७ ड्रम, ५ हजार ४०० किलो महुआ, २०० लिटरचे रबरी ट्यूब, हातभट्टी मोहाच्या दारूसह २ लाख ९० हजारांचा माल जप्त करण्यात आला. अज्ञात आरोपीविरुद्ध अबकारी अधिनियम १९१५ (३४) (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन अज्ञात आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क खात्याचे प्रभारी उपनिरीक्षक डी. के. भादे, जयंत मस्कोले, आठनेर पोलीस स्टेशनचे पथक, मोर्शी राज्य उत्पादन शुल्क खात्याचे रवि राऊतकर, के. एन. कुंमरे यांचे अधिनस्त कर्मचारी, मध्यप्रदेश वनविभाग खात्याचे अधिकारी व कर्मचारी याचा सहभाग होता. मध्यप्रदेश सीमेवर अवैध दारूचा महापूर आला असून, मोर्शी तालुक्यातील हजारो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.