अमरावती - धारणी येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे तालुकास्तरीय जि.प. प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवात कबड्डी स्पर्धेदरम्यान गुरुवारी शिक्षकांच्या दोन गटांत फ्री-स्टाईल झाले. याप्रकरणी दोन शिक्षकांवर निलंबनाची, तर तिघांविरुद्ध पगारवाढ थांबविण्याची कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती मिळाली आहे. धारणी तालुक्यातील चटवाबोड व खा-याटेंभरू येथील जिल्हा परिषद शाळांच्या संघादरम्यान कबड्डीचा अंतिम सामना सुरू होता. या सामन्यासाठी पंचायत समिती सभापती रोहित पटेल व उपसभापती जगदीश हेकडे हे पंचगिरी करीत होते. सामन्यादरम्यान पंचांच्या एका निर्णयावर वाद निर्माण होऊन दोन्ही पक्षांतील शिक्षक आमने-सामने आले. वाद विकोपाला गेल्यानंतर हमरीतुमरीचे हे प्रकरण एकमेकांना चोप देण्यापर्यंत वाढले. याप्रकरणी पाच शिक्षकांना दोषी ठरविण्यात आले असून, यापैकी दोघांचे निलंबन करण्याचा व तिघांची पगारवाढ थांबविण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. गटशिक्षणाधिकारी मोहम्मद युनूस यांनी मात्र सध्या कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती दिली.
बीडीओ, बीईओ यांची ‘आंखोदेखी’पंचायत समिती सभापती, उपसभापतीच नव्हे, तर धारणीचे गटविकास अधिकारी उमेश देशमुख व गटशिक्षणाधिकारी मोहम्मद युनूस शेख इस्माईल यावेळी उपस्थित होते. शिक्षकांच्या गैरवर्तणुकीबाबत जागीच निपटारा करण्यासाठी दोषी पाच शिक्षकांची या चौघांपुढे पेशी झाली.
कुठल्याही आयोजनात विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही शिस्त पाळावी. शिक्षकांनी केलेले कृत्य दुर्दैवी आहे. दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल. - रोहित पटेल, सभापती, पंचायत समिती, धारणी