नीलेश रामगावकर
तळेगाव दशासर : एकीकडे दुसऱ्या लाटेतील कोरोना विषाणू जीवघेणा ठरत असताना शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाबतच्या पसरलेल्या अंधश्रद्धा नागरिकांना कोरोनाच्या खाईत ढकलण्यास कारणीभूत ठरत आहेत.
तीव्र स्वरूपाची लक्षणे असूनही अनेकजण कोरोना चाचणीसाठी टाळाटाळ करत असून, गावखेड्यातील डॉक्टरांकडून औषध घेऊन आजार अंगावर काढत असल्याचे भयावह चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. कोरोना म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील फार मोठे षडयंत्र आहे. साधी सर्दी जरी असेल, तरी कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट येतो, मग सरकारी दवाखान्यात भरती करून घेतले जाते. तेथे हाल केले जातात. या आणि असे अनेक तर्क-वितर्क शहरी आणि ग्रामीण भागात लढविले जात आहेत. 'कोरोना बिरोना सब झूट है' अशा फुशारक्या मारत कोरोनाच्या त्रिसूत्रीला खुंटीवर टांगून गावभर हुंदडणाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. अनेकदा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही संबंधित रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यास थेट नकार देत असल्याने आरोग्य प्रशासनही हतबल झाले आहे. अशा मानसिकतेतूनच कोरोना मुत्यूदर वाढत आहे.
अशावेळी संबंधित डॉक्टरने त्या रुग्णाला कोरोना चाचणी करून घेण्याबाबत सल्ला देणे गरजेचे असते. मात्र संबंधित डॉक्टरकडून असा सल्ला दिलाच जात नाही.
ही कुठली मानसिकता
जोवर रुग्णाची प्रकृती खालावत नाही, तोपर्यंत रुग्णही त्याच डॉक्टरकडून उपचार घेतो.
एवढे करूनही प्रकृतीत फरक पडला नाही, तर मग शासकीय रुग्णालयाची वाट धरली जाते. रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत आल्यानंतर डॉक्टरही हतबल होतात. अतिशय गंभीर अवस्थेत आलेल्या रुग्णांचे प्राण वाचविणे डॉक्टरांनाही कठीण चालले आहे. त्यामुळे थोडी जरी लक्षणे आढळली, तरी संबंधित रुग्णाने तातडीने कोरोना चाचणी करून घेऊन पॉझिटिव्ह आल्यास उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.
तळेगाव येथे कोरोनाच्या सावटात तापाची साथ
सध्या तळेगावसह ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक वाढतच आहे. सध्या तालुक्यात कोरोनाने थैमान घातल्याने सर्वत्र भीतीच्या वातावरण आहे. शासकीय यंत्रणा कडक उपाययोजना करत कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच तळेगाव दशासर येथे तापाच्या साथीने थैमान घातल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.