नरेंद्र जावरे चिखलदरा( अमरावती) - मेळघाटातील चूरणी येथील स्वातंत्र्यवीर अजाबराव काळे कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापकाने जीर्ण, फाटका आणि मळलेल्या तिरंग्याचे ध्वजारोहण २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त संदर्भात सरपंच व गावकऱ्यांनी पंचनामा करून भारतीय ध्वजसंहिते नुसार कारवाही करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाला केली आहे. खुद्द स्वातंत्र्यवीर यांच्या नावाने असलेल्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांच्या या बेताल कारभारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मेळघाटातील दुर्गम व अति दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये असलेल्या स्वातंत्र्यवीर अजाबराव काळे कनिष्ठ महाविद्यालयात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुवारी ध्वजारोहण करण्यात आले. सदर तिरंगा जीर्ण व फाटका छिद्र असलेल्या अवस्थेत फडकविण्यात आल्याची माहिती गावातील नागरिकांना मिळाली. त्यानंतर सरपंच नारायण नंदा चिमोटे उपसरपंच आशिष टाले सदस्य रवी कुमार सेमलकर ग्रामसेवक अमरदीप तुरकाने विनोद हरसुले रुपेश भक्ते सुमित चावरे अरविंद टाले विनोद अलोकार रघुनाथ रेचे आधी मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी जाऊन पंचनामा केला. जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाला शाळेच्या मुख्याध्यापकासह संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र लहाने यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
स्वातंत्र्यवीर अजबराव काळे महाविद्यालयात छिद्र असलेला जीर्ण तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. त्या संदर्भात सरपंच सदस्यांसोबत जाऊन पंचनामा करण्यात आला.अमरदीप तुरकाने सचिव ग्रामपंचायत चूरणी