अमरावती : एका तरुणाची तरुणीशी मैत्री झाली. त्यानंतर त्याचे प्रेमात रुपांतर झाले. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून धारणी येथे नेऊन शारीरिक संबंध प्रस्तापित केले. यात तरुणी गर्भवती झाल्याने तिने लग्न करण्याची मागणी केली असता, त्याने लग्नास नकार दिल्याने तरुणीने थेट गाडगेनगर ठाण्यात धाव घेतली. ही घटना शहरात २०१७ ते २०२१ दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविला.
पोलीससूत्रानुसार, सिद्धार्भ हरिभाऊ तसरे(२८, रा. नवसारी विद्युत तांत्रिकनगर) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात एका २४ वर्षीय तरुणीने तक्रार दिल्यानुसार आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी भादंविचे कलम ३७६(२),(एन), ४१७,५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. तक्रारीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या मामेभावाकडून तिचा मोबाईल क्रमांक घेऊन संवाद साधला. दरम्यान दोघात प्रेम झाले. सन २०१७ मध्ये आरोपी तरुणीला धारणी येथे घेऊन गेला. तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने तरुणीला पुणे येथे नर्सिंगकरिता प्रवेश करून दिला. २८ मार्च २०१८ रोजी तरुणी अमरावतीला आल्यानंतर आरोपी पुन्हा तिला भेटला. लग्नाचे आमिष दाखवून पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने २०१८ ते २०२० दरम्यान दुसऱ्या एका मुलीशी लग्न केल्याने तिने आरोपीशी बोलणे बंद केले. त्याने पुन्हा २७ जून २०२० मध्ये भेटणे सुरू केले. मार्च २०२१ मध्ये ती अमरावती येथील एका हॉस्पिटलमध्ये कामाला असताना तेथे भेटायला व त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनी ती गर्भवती असल्याची माहिती तिने आरोपीला दिली. माझ्यासोबत लग्न कर, असे म्हटले असता, आधीच विवाहित असलेल्या तरुणाने तिला लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे तिने पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास पीआय आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात एपीआय पूजा खांडेकर करीत आहे.