अमरावती : विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शाळेची बँकेत खाती असणे अनिवार्य आहे. मात्र, वारंवार बँक बदलण्यात येत असल्याने मुख्याध्यापकांवर आता ग्रामीण भागातील बँकेची शाखा शोधण्याची वेळ आली आहे.
२००२ पासून सुरू झालेल्या समग्र शिक्षा अभियानाचे १९ वर्षांच्या कालावधीत आतापर्यंत चार वेळा बँक बदलण्यात आली. आता पाचव्यांदा बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत खाते काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्याध्यापकांना सर्व शिक्षा अभियानासोबतच, शालेय पोषण आहार, ४ टक्के सादिल योजना व समाज सहभाग यांचे खाते काढावे लागतात. या सर्व खात्यांच्या व्यवहाराचा विचार करून मुख्याध्यापक खाते काढतात. सध्या खाते असलेल्या बँकेत, इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस अशा सर्व सुविधा आहेत. शाळेपासून लगतच्या अंतरावर असणारे बँकेत खाते सोयीचे असूनही आता संपर्काच्या दृष्टीने गैरसोयीच्या असणाऱ्या बँकेत नव्याने खाते उघडावे लागणार आहे. बँक व्यवहाराच्या दृष्टीने संपर्कासाठी गैरसोयीचे ठरणार आहे. या बँकेत नव्याने खाते काढण्याचे धोरण शैक्षणिक गुणवत्ता ऱ्हासाचे कारण ठरते. बँक खाते बदलण्याचे कारण समजले नसल्याची प्रतिक्रिया शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली, तर काही मुख्याध्यापकांनी अडचणीची आणखी एक बाब नमूद करीत जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत लिपिक किंवा अन्य शिक्षकेतर कर्मचारी नसतो. राज्यातील ६० टक्के शाळेत सहायक शिक्षक, मुख्याध्यापकांचा प्रभार सांभाळतात. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद ग्रामीण भागात शेतकरी पालकांकडे असते. मुख्याध्यापक सचिव असतो. खाते काढताना वारंवार अध्यक्ष असलेल्या शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे मुख्याध्यापकास अध्यापन कार्यालयीन कामकाज व शैक्षणिक कामे व आता सोबतच खाते बदलण्यासाठी शेतकरी अध्यक्ष सोबत घेऊन बँकेत चकरा माराव्या लागत आहे.
कोट
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते काढण्याची वेळ आली असून, अनेक जिल्ह्यांत या बँकेच्या तालुका पातळीवरील शाखा नाहीत. अमरावती जिल्ह्यात या बँकेच्या फक्त ४० शाखा असून, पंचायत समिती मुख्यालय असलेल्या ठिकाणी बँकेच्या शाखा नाहीत.
उदय शिंदे
राज्य अध्यक्ष प्राथमिक शिक्षक समिती