अमरावती: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी २७ ऑक्टोबर रोजी पहाटे एक ते पाचपर्यंत ऑपरेशन ऑल आऊट राबविले. मोहिमेदरम्यान पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, सर्व पोलिस उपाधीक्षक, ठाणेदार असे एकूण ७३ पोलिस अधिकारी व ४८८ पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला.
मोहिमेदरम्यान महत्त्वाचे रस्ते, जिल्हा तथा राज्याच्या सीमेवर सशस्त्र नाकाबंदी नेमून वाहनांची व सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. फरार म्हणून घोषित अशोक ऊर्फ मिनेश गुलाबराव इंगोले (२९ वर्षे, रा. आंबेडकरनगर, अशोकनगर, यवतमाळ) यास अटक करण्यात आली. परतवाडा, अंजनगाव सुर्जी व वरूड पोलिसांनी शेख सादिक ऊर्फ चिची शेख सलीम (वय २०, परतवाडा), राकेश गणेश शाहू (३०, अंजनगाव सुर्जी) व दिलीप भीषण सिरसाम (३८ वर्षे, रा. वरूड) या आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियमान्वये कार्यवाही करण्यात आली. इक्बाल खान मेहबुब खान (वय ४० वर्षे, रा. पाण्याचे टाकीजवळ, मुघलाईपुरा, परतवाडा) हा रात्रीदरम्यान संशयास्पदरीत्या फिरत असताना मिळून आला. त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
गुटखा, दारू पकडलीमोहिमेदरम्यान पकड वॉरंटमधील एकूण १६ आरोपींना अटक करण्यात आली. अवैध दारूविरुद्ध एकूण २३ केसेस करून १.८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अचलपूर, परतवाडा, ब्राह्मणवाडा थडी, वरूड येथे एकूण गुटख्याच्या ५ केसेस करून ९० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अचानकपणे सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे समाजकंटक व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर चांगलाच वचक बसला आहे.