श्रीकांत देशपांडे यांचा पुढाकार : बुधवारी निर्णयाची शक्यताअमरावती: मागील १५ वर्षांपासून विनाअनुदानित शाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रश्न कायम असून सात दिवसांपासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या त्यांच्या बेमुदत उपोषणाची साधी दखलही घेतली गेली नाही. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाचे आ. श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अन्यायग्रस्त शिक्षकांच्या व्यथा मांडल्यात. त्यामुळे बुधवारी मंत्रालयात विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांवर तोडगा निघू शकतो.येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात अमरावती विभागातील कायम विनाअनुदानित शिक्षकांनी बेमुदत उपोषण चालविले आहे. मात्र, शासनाने त्याची दखल घेतली नाही तर शिक्षकांनी बेमुदत उपोषणासह मुंडन, रक्तदान, मूकमोर्चा, थाळीनाद आंदोलन करून हा लढा अधिक तीव्र केला आहे. आंदोलन दररोज तीव्र होत असताना शासन कोणतीही दखल घेत नसल्याने आ. श्रीकांत देशपांडे यांनी ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या लक्षात आणून दिली. अन्यायग्रस्त शिक्षकांच्या समस्या न सोडविल्यास विनाअनुदानित शाळांचे शिक्षक आक्रमक पवित्रा घेतील, ही महत्त्वपूर्ण बाब आ. देशपांडे यांनी निदर्शनास आणून दिली. आ. देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्यांचे निवेदनही सादर केले. मुख्यमंत्र्यांनी अनुदानविषयी ८ जून रोजी सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही दिली आहे.
विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात
By admin | Published: June 08, 2016 12:05 AM