फोटो - २५ पी घरकुल
(फोटो ओळ - मुंबई - म्हाडाचे कार्यकारी अभियंता अमोल बुडकुंडवार यांना निवेदन देतांना आपचे प्रदेश सचिव धनंजय शिंदे)
-------------------------------------------------------
आम आदमी पार्टीचे प्रदेश सचिव यांनी घेतली म्हाडाच्या अधिकाऱ्यांची भेट
चांदूर रेल्वे : आम आदमी पार्टीचे प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा प्रलंबित निधी १५ ऑगस्टपूर्वी मिळण्याची शक्यता या भेटीनंतर आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटनमंत्री तथा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन गवळी यांनी व्यक्त केली. आम आदमी पार्टीचे पदाधिकारी निधीसाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहेत.
पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या निधीसाठी लाभार्थींना चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या चकरा माराव्या लागत आहे. सदर निधीसाठी आम आदमी पार्टीकडून डेरा आंदोलनसुद्धा करण्यात आले. मात्र, निधीसाठी केवळ आश्वासने मिळत आहेत. चार महिन्यांपासून मुंबई येथे घरकुलाचे ३०२ कोटी ५० लाख रुपये निधी केंद्राकडून राज्याकडे जमा झाल्याचे पत्र आहे. एवढ्या दिवसांपासून मात्र लाभार्थींपर्यंत सदर निधी पोहोचलेला नाही. ही माहिती नितीन गवळी यांनी मुंबई येथील आम आदमी पार्टीचे प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांना दिली. त्यांनी काही कार्यकर्त्यांसमवेत शुक्रवारी मुंबई येथील मंत्रालयातील म्हाडाचे कार्यालय गाठले. तेथील पंतप्रधान आवास योजना कक्षाचे कार्यकारी अभियंता अमोल बुडकुंडवार यांची भेट घेतली व निधीबाबतचे निवेदनसुद्धा दिले. यावेळी सदर अधिकाऱ्याने १५ ऑगस्टपूर्वी घरकुलचा निधी सर्वत्र वितरित होणार असल्याची माहिती दिल्याचे नितीन गवळी सांगितले.
(बॉक्समध्ये घेणे)
प्रशासनाची दिरंगाई खेदाची बाब
घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांचे निधी चार-चार महिने प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडतो, ही खेदाची बाब आहे. नितीन गवळी यांच्याकडून माहिती मिळताच मी मुंबईच्या म्हाडा येथील कार्यालयाला भेट दिली व तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली, असता १५ ऑगस्टपूर्वी निधी वितरीत करणार असल्याची माहिती दिल्याचे आम आदमी पार्टीचे प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले.