लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘मनरेगा’अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना वेळेत वेतन न मिळाल्याच्या तक्रारीची दखल घेऊन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे हा निधी तातडीने उपलब्ध होऊन वेतनाचे वाटपही सुरू झाले आहे. मनरेगाच्या कामांमध्ये अमरावती जिल्हा सुरुवातीपासून आघाडीवर असून, मोठी रोजगारनिर्मिती व विकासकामेही त्याद्वारे होत आहेत. त्यामुळे मजूर बांधवांना वेतन आदी प्रक्रिया नियमित व्हावी, यासाठी प्रशासनाने सजग राहून कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातून आदिवासी बांधव कामाच्या शोधात स्थलांतरित होतात. हे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाअंतर्गत कामे राबविली जातात. स्थानिक स्तरावर मनरेगात रोजगारनिर्मितीची शक्यता व विविध विकासकामांना चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यात व्यापक नियोजन करण्यात आले आहे. विशेषत: कोरोनाकाळात मेळघाटात मोठ्या प्रमाणावर कामे राबविण्यात आली. त्यामुळे मोठी रोजगारनिर्मिती होऊन अमरावती जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया व्यापक करतानाच निधीही वेळोवेळी प्राप्त होण्यासाठी प्रशासनाने नियमित पाठपुरावा करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. मनरेगाअंतर्गत निधी प्राप्त होऊन मजुरांच्या खात्यात वेतन जमा होऊ लागली आहे, अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी दिली.मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना देण्यात आली. त्यातून जलसंधारण, इमारत बांधकाम, रस्तेदुरुस्ती अशी अनेक कामे अमरावती जिल्ह्यात अधिक होत आहेत. मेळघाटातही स्थलांतर रोखण्यासाठी व स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीसाठी व्यापक स्वरूपात कामे करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार कामांना गती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.