चिखलदरा : चुरणी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दगावलेल्या दोन दिवसाच्या नवजात बाळावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. परिचारिकेचे निलंबन केले असले तरी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
तालुक्यातील बुटीदा येथील अंजली अजय अखंडे या महिलेच्या दोन दिवसाच्या बाळाचा चुरणी ग्रामीण रुग्णालयात शनिवारी पहाटे ५ वाजता मृत्यू झाला. बाळाची प्रकृती ढासळत असताना अजय अखंडे यांनी रात्री वारंवार परिचारिका व डॉक्टरांना आपल्या त्यावर उपचार करून वाचवण्याची विनंती केली. मात्र, कर्तव्यावर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. अखेर बाळ दगावले. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रहार कार्यकर्ते व गावकऱ्यांनी चुरणी ग्रामीण रुग्णालयात १६ तास ठिय्या दिला. या गंभीर प्रकरणाची तक्रार मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना करण्यात आली होती. त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम व अकोला येथील आरोपी उपसंचालक राजकुमार चव्हाण यांना संबंधितांवर कारवाई करण्याचे पत्र पाठविले होते.
बॉक्स
डॉक्टरवर कारवाई करा?
या संपूर्ण प्रकरणात परिचारिका वर्षा नवगिरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात कर्तव्यावर कार्यरत डॉक्टरांवर निलंबन कारवाई करण्याच्या मागणीवर आ. राजकुमार पटेल ठाम आहेत. तसे पत्र त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले असून, तत्काळ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना या गंभीर प्रकरणाची तक्रार केली जाणार असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.