गेटसमोरच मृतदेहाला विसावा, खचलेल्या पुलामुळे अंत्यविधीसाठी वळसा
प्रशासनाचा केला निषेध
सूरज दाहाट - तिवसा : स्थानिक नगरपंचायत कार्यालयाला लागून असलेल्या बौद्ध स्मशानभूमीत जाणाऱ्या रस्त्यावरील पूल पावसामुळे खचल्याने अंत्ययात्रा नगरपंचायत कार्यालयाच्या आवारातून न्यावी लागत आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी दुपारी चक्क कार्यालयाच्या गेटसमोर एका मृतदेहाला विसावा दिला.
तिवसा येथे १० सप्टेंबर रोजी मुसळधार पावसामुळे मोठ्या नाल्यावरील रपटा खचल्याने स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बंद झाला. त्यामुळे येथील नागरिकांना मृतदेह नगरपंचायत कार्यालयाच्या परिसरातून वा त्याला वळसा घालून न्यावा लागत होता. हा रस्ता महत्त्वाचा असूनही नगरपंचायतने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, नरेंद्र किसन मकेश्वर (६७) वर्ष यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा नगरपंचायतीच्या परिसरातून घेऊन जात असताना चक्क कार्यालयाच्या गेटपुढेच मृत्यूदेहाला विसावा देऊन नागरिकांनी खचलेल्या पुलाची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. स्थानिक प्रशासनाने भावनांचा अंत पाहू नये, असा इशारा अंत्ययात्रेत उपस्थित नागरिकांनी दिला.
कोट
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनांतर्गत पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया होणार आहे. काही दिवसांत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन कामाची वर्कऑर्डर देण्यात येईल. हा पूल तिवसा शहरातील जनतेच्या सेवेत पुन्हा सुरू होणार आहे.
- पल्लवी सोटे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, तिवसा
-------
कोट
मी यासंदर्भात वारंवार मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. नागरिकांनादेखील मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत. याकडे तातडीने लक्ष द्यावे.
- नरेंद्र विघ्ने, माजी नगरसेवक