शाहू महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिन
चांदूर रेल्वे : राजर्षी शाहू महाविद्यालयात २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित विभागातर्फे लँग्वेज ऑफ मॅथेमॅटिक्स या विषयावर वेबिनार झाले. अमरावतीचे राहुल मापारी यांनी विचार मांडले. प्राचार्य एस.एस. ठाकरे, जी.बी. संताप, ममता पळसपगार, गणित विभागप्रमुख आर.व्ही. केने यांनी सहभाग घेतला.
-----------
असदपूर येथे घाणीचे साम्राज्य
असदपूर : असदपूर-शहापूर या जोड गावांमध्ये ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणाहून घाण पाणी रहदारीच्या रस्त्यावर येऊन वाहत जाते. मुस्लिम वस्तीत सांडपाण्याच्या नाल्या तुडुंब भरल्या आहेत. याशिवाय रस्त्यावर डबके साचलेली आहेत. गावात पसरलेली घाण, नाल्या साफ करून नागरिकांना रोगमुक्त करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे.
----------
असदपूर परिसरात रेतीचोरी
असदपूर : पूर्णा नदीपात्रातून रेतीचोरी वाढली असली तरी त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला तसेच नदीने तळ गाठून ती कोरडी होण्याकडे वाटचाल सुरू आहे. यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने रेतीचा साठा मोठ्या प्रमाणात आहे.
------------
ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी सरसावले युवक
गुरुकुंज मोझरी : तिवसा तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध करून गावातील एकोपा वाढविण्यासाठी युवा वर्ग सरसावला आहे. कोरोनाकाळात आर्थिक घडी विस्कटली असल्याने हा विचार गावोगावी युवा वर्गातून पुढे येत आहे. तथापि, काही ठिकाणी त्यांना विरोध होत आहे.