मुख्यमंत्री : शेंडगाव येथे अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण अमरावती : गुरूकुंज मोझरी येथील तुकडोजी महाराज हे राष्ट्रसंत आहेतच. परंतु अखिल मानव जातीला मानवतेचा संदेश देणाऱ्या कर्मयोेगी संत गाडगेबाबांचे कार्यदेखील अतुलनीय असेच आहेत. त्यामुळे गाडगेबाबा हेसुध्दा राष्ट्रसंतच आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे काढले. वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांच्या जन्मगाव शेंडगाव येथे रविवारी त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व जलयुक्त शिवारच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ.रमेश बुंदिले, प्रभुदास भिलावेकर, अनिल बोंडे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, सीईओ सुनील पाटील, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहणकर, शिवराय कुलकर्णी, सरपंच कल्पना खंडारे, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार पवार, संत गाडगेबाबांचे नातू हरीनारायण जानोरकर आदी उपस्थित होते.गाडगेबाबांच्या पुतळ्याचे अनावरण ही भाग्याची बाबअमरावती : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पुढाकार घेऊन शेंडगाव येथे संत गाडगेबाबांचा पुतळा दिला होता. त्यांचे अनावरण माझ्या हस्ते झाले. ही भाग्याची बाब असल्याचे यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्याला संतांची भूमी म्हटले जाते, असे सांगून माऊली ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत संतांची मांदियाळी महाराष्ट्राने बघितली आहे. आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच होऊ शकतो, याची शिकवण संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिली, असे गौरवोदगार देखील त्यांनी काढले. लोकसहभागातून निर्माण झालेली चळवळ चिरकाल टिकते. संत गाडगेबाबांनी स्वत: हाती झाडू घेऊन ग्रामस्वच्छतेच्या कामाला सुरूवात केली. त्यांच्यामागे सर्वच लोक स्वच्छता मोहिमेत उतरले. पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना मांडली. या मोहिमेत सामान्यांचा सहभाग अपेक्षित आहे. राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले जाते. या अभियानासाठी पुरस्कार घोेषित करण्यात आले आहेत. मागील वर्षभरात पाच हजार गावे निर्मल झाली आहेत. आजही ती गावे पूर्णपणे स्वच्छ असल्याचे पाहायला मिळते, हेच या अभियानाचे यश आहे. असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले. आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. दर्यापूर येथील खारपाणपट्टयात शेतकऱ्यांना हमखास संरक्षित सिंचन घेऊन बागायती शेती करण्यासाठी उपयुक्त असलेल्या एका गावात ८० शेततळ्यांची मालिका जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. रमेश बुंदिले यांनी देखील विचार व्यक्त केले. ते म्हणाले, संत गाडगेबाबांच्या तालुक्यात ५० खाटांचे रूग्णालय, दर्यापूर येथील बंद सुतगिरणीचे पुनरूज्जीवन, अंजनगावातील अंबा साखर कारखाना सुरू करणे, अंजनगाव एसटी आगारासाठी निधी, शेंडगावात स्वच्छतेचे धडे देणारे प्रशिक्षण केंद्र निर्माण करणे आदी मागण्या त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली. प्रास्ताविकातून जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची माहिती दिली. संचालन क्षीप्रा मानकर यांनी केले. जलयुक्त शिवार अभियानाची पाहणीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांनी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत करण्यात आलेले शेततळे, पादंण रस्ते ही पाहणी केली यामध्ये मदलापूर, नरदोरा, माहुलीधांडे, शेडगाव आदि ठिकाणी भेटी दिल्या.(प्रतिनिधी)नरदोडा येथील शेततळ्यांची दुर्बिणीने पाहणीत्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा नरदोड्याकडे वळला, नरदोरा परिसरात कृषी विभागाने एकाच गावातील ८० शेततळे करण्यात आली असून त्यापैकी ४४ शेततळे पूर्ण झाली असून त्या मालिकेची मुख्यमंत्र्यांनी व पालकमंत्र्यांनी दुर्बिणमधून पाहणी करून याचे कौतुक केले. यावेळी विलास टाले, माणिक टाले, विलास पोटे यांनी त्यांचे स्वागत केले. सरपंच सुनीता टाले, अनंतराव टाले उपस्थित होते.माहुली धांडे येथे पालकमंत्री पाणंद रस्त्याचे उद्घाटनमाहुली धांडे येथे पालकमंत्री पांदन रस्त्याचे उद्घाटन व नवीन रस्त्यांचे उद्घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सतीश साखरे, उपसरपंच अशोक गवई, विजय साखरे आदी उपस्थित होते.मधलापूर येथे गॅबीयन बंधाऱ्याची पाहणी प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी भातकुली तालुक्यातील मधलापूर येथील अंबाडा नालावरील गॅबीयन बंधारा खोलीकरण व रुंदीकरणाची पाहणी केली. नदी, नाले पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत या बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता तायडे यांनी दिली. यावेळी शेतकरी नेते अरविंद नळकांडे यांनीही खारपाणपट्ट्यांची माहिती त्यांना दिली. थिलोरी रस्त्यावरील शेततळ्याची पाहणीअमरावती मार्गावरील थिलोरीनजीक वैशाली धर्माळे यांच्या शेतात मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या ३० बाय ३० च्या ३ या शेततळ्यांची पाहणी केली. शेतकरी अमोल धर्माळे यांनी शेततळ्याच्या उपयुक्ततेबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. नुकताच झालेल्या एक दिवसाच्या पावसात या शेततळ्यात थोडे पाणी साचले आहे.
गाडगेबाबासुद्धा राष्ट्रसंतच !
By admin | Published: May 08, 2016 11:57 PM