अमरावती : शालेय शिक्षणही न लाभलेले संत गाडगेबाबा वऱ्हाडी बोलीचे सर्वात मोठे साहित्यिक होते. त्यांचे कीर्तन ही उत्कृष्ट ललितकृतीच आहे. वऱ्हाडी बोलीचा महाराष्ट्रभर प्रभावी प्रचार, प्रसार त्यांनी केला.वऱ्हाडीचे रंजन-प्रबोधनाचे सामर्थ्य त्यांनी आधोरेखित केले. अशा आशयाचे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी सतीश तराळ यांनी काढले. मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय सभागृहात वऱ्हाडी प्रतिष्ठानतर्फे आयोजित पहिल्या वऱ्हाडी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सतीश तराळ बोलत होते.
दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद) व अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, प्राचार्य संयोगिता देशमुख, वऱ्हाडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष का.रा. चव्हाण, स्वागताध्यक्ष दिलीप निंभोरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सतीश तराळ पुढे म्हणाले, गाडगेबाबांच्या १२ हजार कीर्तनांपैकी फक्त एकच शेवटचे कीर्तन उपलब्ध असल्यामुळे फार मोठ्या वऱ्हाडी वाङ्मयीन मेव्याला आपण मुकलो आहोत. ही फार मोठी वाङ्मय हानी आहे. ते पुढे म्हणाले, बोलीच भाषेला ऊर्जा, सत्व, शक्ती, गोडवा प्रदान करते. म्हणून बोलींचे जतन भाषा संवर्धनासाठी आवश्यक असते. बोली भाषेच्या बलस्थान असतात. मराठी भाषेतील आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’च्या निर्मितीत वऱ्हाडीचे योगदान आहे. वऱ्हाडी बोलीतील कथा, कादंबरी, कविता, वाङ्मयाचे सामर्थ्य तराळ यांनी स्पष्ट केले. वऱ्हाडी साहित्यात ललित निबंध, आत्मचरित्र, चरित्र, समीक्षक, नाटके, बाल साहित्य नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
कौतिकराव ठाले पाटील यांनी साहित्य निर्मितीत बोलीचे महत्त्व विस्ताराने स्पष्ट केले. याप्रसंगी प्राचार्य संयोगिता देशमुख यांनीही विचार मांडले. स्वागताध्यक्ष दिलीप निंभोरकर यांनी स्वागतपर भाषण केले. भूमिका कथन वºहाडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष का.रा. चव्हाण यांनी केले. संचालन मंदा नांदूरकर यांनी केले. याप्रसंगी रमेश अंधारे, केशव तुपे, दिनकर दाभाडे, हास्यसम्राट मिर्झा रफी महमद बेग, रामचंद्र काळुंखे आदी मंडळी उपस्थित होती.