अमरावती : धामणगाव रेल्वे येथील श्री गजानन सहकारी सूतगिरणीचा वापर माजी आमदार अरुण अडसड, त्यांचे पुत्र आमदार प्रताप अडसड यांनी कुटुंबासाठी केला. ही बाब स्पष्ट झाल्याने वस्त्रोद्योेग आयुक्तालयाकडून त्यांच्यासह संचालक मंडळावर ताशेरे ओढत सूतगिरणीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अडसड पिता-पुत्र यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून सूतगिरणीची रक्कम वसूल करावी, अशी मागणी माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली आहे.
गजानन सूतगिरणीत अनेक गैरव्यवहार असल्याची तक्रार आपण पुराव्यांसह २० ऑगस्ट २०२० रोजी वस्त्रोद्योग आयुक्तालयाकडे केली होती. मात्र, त्यानंतर अडसड यांच्यासह संचालक मंडळाकडून वेळकाढू धोरण अवलंबिण्यात आले. त्यानंतर वस्त्रोद्योग उपायुक्तांकडून सूतगिरणीच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल आयुक्तांना सादर केला असून, यामध्ये अनेक बाबींवर आक्षेप घेण्यात आल्याचा दावा जगताप यांनी केला. सूतगिरणीचा तोटा वाढला असतानाच एका बँकेकडून ४.९५ कोटी रुपयांच्या भांडवलाचा उपयोग त्यांनी वैयक्तिक कारणांसाठी केला. सूतगिरणीमधील अनेक गैरप्रकार समोर आले असून संचालक मंडळ नियमाप्रमाणे कामकाज चालवू शकत नाहीत. परिणामी संचालक मंडळ बरखास्त करून सहायक निबंधक सहकारी संस्था यांची प्रशासक म्हणून २० जुलै रोजी नियुक्ती करण्यात आल्याचे वीरेंद्र जगताप यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, शिक्षण सभापती सुरेश निमकर, नितीन दगडकर, नितीन कनोजिया, श्रीकांत गावंडे आदी उपस्थित होते.
कोट
गजानन सूतगिरणीचा उपयोग कुुटुंबासाठी केलेला नाही आणि कुठलाही गैरव्यवहार झाला नाही. हा राजकीय हेतुने प्रेरित आरोप आहे. सूतगिरणीला व आम्हाला बदमान करण्याचे हे षडयंत्र आहे. ज्या मुद्यावर वस्त्रोद्योग आयुक्तांनी सूतगिरणीवर प्रशासक नेमला, त्याच मुद्यावर अन्य सूतगिरणींचीही चौकशी करावी व प्रशासक बसवावा.
- प्रताप अडसड, आमदार, धामणगाव रेल्वे