पान २ चे लिड
वरूड : शहरासह तालुक्यात आयपीएल क्रिकेटवरील जुगाराला उधाण आले आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळातही त्यात तरुणाई व्यस्त झाली आहे आहे. कोट्यवधी रुपयांचा ई-सट्टा खेळविला जात आहे. याकरिता अवैध धंदे करणारे सक्रिय झाले आहेत.
देशभरातील निवडक मैदानावर पंधरवड्यापासून आठ संघांत आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. २२ पेक्षा अधिक सामने खेळून झाले. मैदानावर जसजसा आयपीएलचा थरार वाढत आहे, तसतसा ई-सट्टा जोरात सुरू झाला आहे. मोबाईलवरून लाखो रुपयांचा ऑनलाईन सट्टा खेळविला जात आहे. यामध्ये तरुणाई अधिक व्यस्त झाल्याची चर्चा असून, अनेक युवक बेघर होत असून, कर्जबाजारी होऊन अनेकांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. गतवर्षी वरूड पोलिसांनी आयपीएल सट्ट्याचे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त केले होते. मोर्शी, अंजनगाव सुर्जी व परतवाडा येथेही आयपीएल जुगारावर धाड घालण्यात आली होती. मात्र, यंदा हा सट्टा ऑनलाईन व जोरात सुरू असताना, स्थानिक पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष चालविल्याची ओरड आहे.
अवैध धंद्याचे माहेरघर
अवैध धंद्याचे माहेरघर म्हणून वरूड तालुका कुप्रसिद्ध आहे. रेती तस्कराचे केंद्र आहे. जुगार, सट्टा, मटका आदी अवैध प्रकार सुरूच असतात. यातच ऑनलाईनच्या जमान्यात सर्व सेवा सुलभ झाल्या. घर बसल्या मिळू लागल्या. ई-सट्टादेखील घरबसल्या सुरू आहे. इंडियन प्रीमिअर लीग एप्रिलपासून सुरू झाले. या खेळात खेळाडू, धावा, विकेटपासून, तर रनरपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सट्टा लावला जातो. यामध्ये तरुणाई सर्वाधिक व्यस्त आहे. गूगल पे, फोन पे या माध्यमातून ऑनलाईन रक्कम संबंधिताच्या बॅंक खात्यात वळती करण्यात येत आहे. यामध्ये लाखो रुपये लावले जात आहेत.
पोलिसांना का दिसत नाही?
वरूड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर क्रिकेट सट्टा सुरू आहे. उपाहारगृह, बार, रेस्टाॅरेंट तसेच चावडीवर बसून आयपीएल जुगार खेळला जात असून, लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यावर अंकुश कोण लावणार, हा प्रश्न आहे. अनेक कर्जबाजारी युवक आत्महत्येसारख्या विघातक पर्यायाकडे वळल्याची चर्चा जोरात आहे.