अमरावती : शासकीय कर्मचाऱ्यांनी कामाचा तणाव दूर करण्यासाठी खेळात भाग घेणे आवश्यक आहे. तणावाचे व्यवस्थापन करण्याकरिता स्पर्धा आवश्यक असून सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात खेळाडू वृत्तीने कार्य केल्यास कार्यालयीन कामाचा तणाव कमी होतो, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी केले. गुरुवारी सकाळी ९ वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आयोजित जिल्हा परिषेदेच्या जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रंसगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष सतीश उईके, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, शिक्षण व बांधकाम समिती सभापती गिरीश कराळे, महिला व बाल कल्याण समिती सभापती वृषाली विघे, समाजकल्याण समिती सभापती सरिता मकेश्वर, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके, निरंतर शिक्षणाधिकारी भाऊ टेकाम, प्रमोद कापडे, जयश्री राऊत, चंद्रकांता चौधरी, जिल्हा बालकल्याण अधिकारी कैलास घोडके, संजय तिरथकर उपस्थित होते. मशाल पेटवून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. धारणी येथील पंचायत समितीच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी देशभक्तीवर गीत व नृत्य सादर केले. नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीच्यावतीने लेझिमचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आले. संचालन वैशाली ढाकुलकर व गजानन मते, प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीराम पानझाडे तर आभार जिल्हा बालकल्याण अधिकारी कैलास घोडके यांनी मानले. यावेळी गंगाधर मोहने, डी. यू. गावंडे, संगीता सोनोने, शोभा माळवे, जगदीश सायकसमल, राजेश सावरकर, रवींद्र ढोके, कैलास कावनपुरे, मनीष काळे, संजय राऊत तसेच जिल्हा परिषेदेचे सर्व अधिकारी, संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचारी क्रिडा स्पर्धेत जिल्ह्याचे १४ ही पंचायत समिती मधील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुख्यालयातील कर्मचारी सहभागी झाले आहे. या स्पर्धे नंतर विभाग स्तरावरच्या स्पर्धा अकोला येथे पुढील आठवड्यात होणार आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावर बाजी मारणाऱ्या संघाना विभाग स्तरावर खेळण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार आहे. (प्रतिनिधी)
कामाचा तणाव दूर करण्यासाठी खेळ आवश्यक
By admin | Published: January 08, 2015 10:47 PM