अमरावती : जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाच महिला चोरांनी शहरात धुडगूस घातला. १ फेब्रुवारीला एका ऑटोतील महिलेला लक्ष्य करून त्यांनी बॅग लिफ्टिंगची ‘हॅट्ट्रिक’ साधली. शेगाव नाका, पंचवटी व पुढे गर्ल्स हायस्कूल चौकादरम्यान घडलेल्या या तीनही घटना गाडगेनगर पोलीस ठाण्यात नोंदविल्या गेल्या. त्यामुळे चेन स्नॅचर्सला जेरबंद करून सुटकेचा नि:श्वास घेणाऱ्या गाडगेनगर पोलिसांसमोर आता महिला चोरांच्या टोळीला अटकाव घालण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
२२ जानेवारी रोजी ऑटो प्रवासादरम्यान आपल्या गळ्यातील ३१ ग्रॅमचे ९० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र तीन अनोळखी महिलांनी चोरले, अशी तक्रार एका महिलेने २९ जानेवारी रोजी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली, तर बॅग लिफ्टिंगची अन्य एक घटना २४ जानेवारी रोजी दुपारी शेगाव नाका ते पंचवटी चौकादरम्यान घडली होती. एक महिला ऑटोने कठोरा नाक्याहून पंचवटीकडे जात असताना ३० ते ३५ वर्षे वयोगटातील दोन महिला शेगाव नाक्याहून त्यात बसल्या. त्यांनी त्या महिलेची पर्स चोरली. त्यात तीनपदरी सोन्याचा हार, डोरले, दोन मण्यांची पोत, असे १ लाख ८२ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरले होते. त्या दोन घटनांची शाई वाळते न वाळते तोच, १ फेब्रुवारी रोजी दुपारी ऑटोरिक्षा प्रवासात पुन्हा एका महिलेकडून अर्जुननगर ते गर्ल्स हायस्कूल चौकादरम्यान ७८ हजारांचा ऐवज लांबविण्यात आला. महिला चोरांच्या या धुडगुसामुळे महिला वर्गात दहशत निर्माण झाली आहे.
महिला चोरांच्या दोन टोळ्या सक्रिय
यवतमाळच्या शहर पोलिसांनी तेथील नेताजी नगरातून ताब्यात घेतलेल्या दोन महिलांकडून २ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचे ४८ ग्रॅम सोने जप्त केले. ते सोने आपण अमरावतीतून चोरल्याची कबुली त्यांनी दिली. त्या दोघींना गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर, २४ जानेवारीच्या घटनेचा उलगडा झाला. त्या दोन्ही चोर महिला गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्या ताब्यात असताना १ फेब्रुवारीला पुन्हा तशीच घटना घडल्याने चोर महिलांच्या दोन टोळ्या कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यवतमाळहून आणलेल्या दोन्ही महिला आमच्या ताब्यात आहेत. त्यामुळे १ फेब्रुवारीच्या घटनेतील महिलांची टोळी वेगळी असल्याचा निष्कर्ष काढता येतो. २२ जानेवारी व १ फेब्रुवारीच्या घटनेतील फिर्यादीनुसार, त्या घटनांमध्ये तीन महिला सहभागी होत्या.
- आसाराम चोरमले, ठाणेदार, गाडगे नगर