अचलपूर (अमरावती ) : संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात हिंदू मुस्लीमदृष्टीने अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या अचलपूर शहरात जवळपास दोन हजार लोकांच्या सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुकीतून मुस्लीम अंतयात्रेला वाट मोकळी करून दिली. तसेच अंत्ययात्रेदरम्यान मिरवणुकीतील सर्व वाद्ययंत्रे, लेझीम बंद करून रस्त्याच्या दुतार्फा उभे राहून हिंदू मुस्लीम एक्याचे उदाहरण दिले.
हिंदू-मुस्लीम कौमी एकतेचे उदाहरण प्रस्तुत करणाऱ्या अचलपुरातील झेंडा चौक येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यामध्ये समन्वयक घडविणाऱ्या अचलपूर पोलिसांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.
शुक्रवारी ९ सप्टेंबर रोजी बिलानपुरा अचलपूर येथील एका प्रतिष्ठित मुस्लीम पुरुषाचा मृत्यू झाला. त्याच दिवशी हिंदूंचा गणपती सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीचा दिवस आपण अंत्ययात्रा कशी काढावी हा यक्षप्रश्न मुस्लीम मयत घरातील नागरिकांना पडला.
घरच्या नागरिकांनी याबाबत अचलपूर पोलिसांची संपर्क केला. पोलिसांनी तत्काळ मयत झालेल्या नागरिकांचे घर गाठून नातेवाईकांशी याबाबत चर्चा केली. तसेच अंत्ययात्रेला पूर्ण संरक्षण देण्याची हमी दिली. याबाबत पोलिसांनी झेंडा चौक येथील गणपती मंडळाशी सुद्धा संपर्क करून समन्वयक घालण्याचा प्रयत्न केला.
अचलपुरातील झेंडा चौक हा अति संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. याच भागातून सार्वजनिक गणपती मंडळाची मिरवणुकीची वेळ आणि हाच अंत्ययात्रा रस्ता. मुस्लीम बांधवांना पोलिसांनी विश्वासात घेऊन पूर्ण अंत्ययात्रेला पोलीस बंदोबस्त देण्यास सांगितले, त्यानुसार अंत्ययात्रा बिलनपुरा येथे संध्याकाळी आली व तेथेच जनाजे नमाज पडून मुस्लीम कब्रस्तानकडे निघाली.
अंत्ययात्रेच्या वेळेस झेंडा चौक येथील हनुमान व्यायाम मंडळ व नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक भर रंगात होती. मिरवणुकीमध्ये पारंपारिक वाद्य यंत्रे ढोल ताशे लेझीम होते. मुस्लीम अंतयात्रेत सहभागी ४००- ५०० नागरिक झेंडा चौकात येताच गणपती मंडळांनी आपले सर्व वाद्ययंत्रे व लेझीम बंद करून सर्व नागरिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभे राहून अंत्ययात्रेला रस्ता करून दिला. पोलिसांनी अंत्ययात्रा खिडकी गेटपर्यंत सोडून दिली.
या घटनेनंतर मुस्लीम अमन ग्रुपच्या वतीने गणपती मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. मुस्लीम-हिंदू समाजाचे समन्वयक साधण्याकरता अचलपूरचे ठाणेदार माधवराव गरुड डीबी स्कॉडचे पुरुषोत्तम बावनेर तसेच एलसीबी चे अधिकारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गणपती मंडळांनी केलेल्या या कार्याचे सर्व समाजात कौतुक होत आहे.
मुस्लीमअंत्ययात्रेला हिंदू गणपती सार्वजनिक मंडळांनी आपली वाद्य यंत्रे बंद करून काैमी एकतेचा सुरेख संदेश दिला हिंदू व मुस्लीम दोन्ही समाजाला एकत्र आणण्याकरता अचलपूर पोलिसांनी समन्वय घडून आणला.
- माधवराव गरुड, ठाणेदार, अचलपूर