अमरावती : शुक्रवारी घराघरात गणरायांचे आगमन झाले. यंदा कोरोनाच्या सावटाखाली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालासुद्धा कोविड नियमावलीचे पालन करून गणेशाची स्थापना केली. दरवर्षी गणेशाच्या स्थापनेपूर्वी शहरातील खड्डे बुजविण्यात येतात. मात्र, यंदा महापालिकेच्या बांधकाम विभागाला व सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्ड्यांचा विसर पडला की काय, असा सवाल अमरावतीकरांचा आहे.
इर्विन चौक ते जिल्हाधिकारी मार्ग उखडला आहे. अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे आहेत. कॅम्प ते श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयापर्यंत अनेक ठिकाणी मोठेमोठे खड्डे पडले आहेत. पंचवटी ते अर्जुनगर मार्गावरील खड्डे काही आठवड्यांपूर्वी भरले होते. मात्र, ते गत आठवडाभर झालेल्या पावसाने पुन्हा उखडले असून, ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. कॅम्प ते बसस्थानक मार्गावर खड्डे कायम आहेत, तसेच कठोरा नाका ते रिंगरोड मार्गावर खड्डे पडले आहेत. आता खड्ड्यांचे शहर अशी ओळख अमरावती शहराची निर्माण झाली आहे. शहरात काँक्रिटीकरणाच्या रस्त्याचे काम करण्यात आले; परंतु रस्ता लगतच्या नाल्यांची कामे प्रलंबित असल्याने रस्त्यावरील पावसाचे पाणी व्यापारी संकुलात शिरून व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. शहरातील प्रशासनाने हा सावळागोंधळ थांबवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गणेशविसर्जनापूर्वी शहरातील रस्त्यांचे खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.