सापन नदीवरील ऐतिहासिक पूल, नागरिकांना नरकयातना, प्रशासनाची डोळेझाक
अचलपूर : गांधी पुलावर मोठे खड्डे पडल्याने येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. याकडे अचलपूर नगर परिषद प्रशासन डोळेझाक करीत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासन विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अचलपूर व सरमसपुरा ठाण्यांची हद्द जोडणाऱ्या सापन नदीवरील ऐतिहासिक गांधी पुलावर ठिकाणी जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. अचलपूर तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागाला जोडणारा हा प्रमुख पूल आहे. गांधी पूल भागात मोठी लोकवस्ती असून महाविद्यालय, विद्यालय, बाजारपेठ, दीक्षाभूमीमुळे नागरिकांची रेलचेल आहे. दररोज शेकडो वाहने पुलावरून ये-जा करतात. या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचते साचलेल्या पाण्यामुळे खड्डा किती मोठा आहे, याचा अंदाज चुकतो. या खड्ड्यांमुळे दररोज या भागात नेहमी लहान-मोठे अपघात होत असतात. रात्रीच्या वेळेला पुलावर अंधार राहत असल्याने आणि खड्डे न दिसल्याने दुचाकीस्वार वाहनावरून घसरून जखमी होतात.
देवडी, चावलमंडी भागातील अनेक व्यापारी तसेच विद्यार्थी गांधी पुलावरून भागातून ये-जा करतात या खड्ड्यांचा त्रास त्यांना मोठ्या प्रमाणावर सोसावा लागतो. साडेचार वर्षांपासून खड्डे जैसे थे आहेत. खड्ड्यांमुळे अनेकांना पाठीचे, मानेचे आजार होत आहेत. वाहनाचे आयुष्यसुद्धा कमी होत आहे. एवढे असूनदेखील अचलपूर नगर परिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा रोष नागरिक व्यक्त करीत आहेत.
230821\3437screenshot_2021-08-23-13-58-04-670_com.whatsapp.jpg
गांधी पुलावर पडले मोठमोठे तालिबानी खड्डे