लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्ह्यातल्या नेरपिंगळाई येथील गुरू गंगाधर वीरशैव मठातील ऐतिहासिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शके ८८५ अर्थात इ.स. ९६३ पासून १०५५ वर्षांची या गणेशोत्सवाची परंपरा आहे. येथील विसर्जन सोहळा देखील वैशिष्ट्यपूर्ण असतो. भाविक विसर्जन स्थळापासून मठापर्यंत म्हणजे दीड किमी अंतर दगड-धोंड्यातून लोटांगण घालत येतात. ही दैवी अनुभूती मानली जाते.या मठाच्या स्थापनेची नोंद मठाच्या प्रवेशद्वारावर आजही आहे. बाराव्या शतकातील कल्याणमधील क्रांतीनंतर सर्व शरणार्थी देशाच्या विविध भागात विखुरले गेले. शरणार्थी बालबस्व यांना घेऊन येथे राहत असताना ते अचानक बेपत्ता झाले. ते परत यावेत, यासाठी गणेशाची आराधना केली आणि नवस बोलला. बालबस्व धावत येऊन त्यांना बिलगले. त्यांनी गणेशाची स्थापना केली आणि गणेशोत्सव प्रारंभ केला, अशी आख्यायिका आहे. गणेशाची स्थापना करण्यात आली, त्याठिकाणी आजही विधीवत माती ठेवली जाते. या मातीवर काशीखंड या धार्मिक ग्रंथाचे संस्कार केले जातात. यानंतर अमरावती येथील मूर्तिकार आजणे यांच्याकडून पारंपरिक स्वरूपाची सात ते आठ फूट उंचीची मूर्ती घडविली जाते.मठाधिपतींकडून आस्थेवाईक चौकशीगंगाधर स्वामींच्या काळात शंभराहून अधिक दिंड्या गणेशोत्सवात सहभागी व्हायच्या. आतादेखील दहा दिवस भाविक व गावकऱ्यांना मठातर्फे अन्नदान केले जाते. विद्यमान मठाधिकारी शिवशंकर शिवाचार्य स्वामी पंगतीत फिरून काय हवं-नको, याची विचारपूस करतात.सामाजिक सौहार्दाचे प्रतीकमठाव्यतिरिक्त गावात पन्नासावर गणेश मंडळे आहेत. काही मंडळांचे अध्यक्ष तर मुस्लिम बांधव राहिले आहेत. मठातील आरतीला सर्वधर्मीयांची उपस्थिती असते. विसर्जन सोहळ्याच्या अग्रभागी मठाचा गणपती, मागे मंडळांचा व त्यानंतर घरगुती गणेशमूर्ती असतात. मुस्लिम भागातून जाणाऱ्या
मिरवणुकीसाठी पिण्याच्या पाण्याची सोय मुस्लिम बांधव करतात. मिरवणुकीत दिंड्या, ढोल-ताशे, भजनी मंडळ व सार्वजनिक देखाव्यांचा समावेश असतो.भाविक घालतात लोटांगणविसर्जन स्थळापासून ते मठापर्यंत मार्गातील दगड-धोंडे पार करून, उन्हाची पर्वा न करता भाविक लोटांगण घालतात. मठातील विहिरीच्या पाण्याने त्यांना अंघोळ घातली जाते व मठाधिपती त्यांना प्रसाद देतात. या लोटांगणादरम्यान कुणालाही इजा होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.