Ganesh Chaturthi 2018; बंदोबस्तात पोलीसदादांच्या घरचा गणपती हरवला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:29 AM2018-09-21T11:29:38+5:302018-09-21T11:33:43+5:30
प्रत्येक नागरिक गणेशोत्सवाचा आनंद घेत असला तरी स्वत:च्या घरातील गणेशाच्या आरतीचे भाग्य मिळत नसल्याची खंत अनेक पोलिसांंनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उन्हं, वारा, पाऊस यासह कडाक्याची थंडी सोसत रस्त्यावर खडा पहारा देताना त्यांच्या वेदना कोणी जाणून घेत नाही. वेळेवर जेवण नाही, झोप नाही, स्वास्थ्य बिघडले असेल तरी सांगायचे कुणाला, अशा गंभीर अवस्थेत ऐन गणेशोत्सवात रस्त्यावर २४ तास पोलीस विभाग दक्षतेने कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्यामुळेच प्रत्येक नागरिक गणेशोत्सवाचा आनंद घेत असला तरी स्वत:च्या घरातील गणेशाच्या आरतीचे भाग्य मिळत नसल्याची खंत अनेक पोलिसांंनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. घराघरांत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना झाली आहे. या गदारोळात पोलिसांचा गणपती मात्र हरवला आहे. आपल्या घरातील गणेशाची स्थापना, आरती किंवा विसर्जनाचे भाग्य त्यांच्यापैकी अनेकांना लाभत नाही. सण, उत्सव ही संकल्पनाच पोलिसांच्या जीवनातून कालबाह्य झाली आहे. गणेशोत्सवच नव्हे नवरात्री, दिवाळी, ईद, नाताळ, नववर्ष, संक्रांतीलाही घराकडे जाता येत नाही. बंदोबस्तात सर्वाधिक कसरत करावी लागते ती मन:स्वास्थ्य सांभाळण्याची. आंघोळ नाही, नाश्ता-जेवणाचा तर पत्ताच नाही; त्यांच्या दु:खाची कुणाला पर्वाच नसल्याचे वास्तव आहे. गणेशोत्सवात जिल्ह्यात १५०० पुरुष, व ५०० महिला पोलीस कर्मचारी कर्तव्यावर आहेत. गणरायाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा कार्यक्रमात कर्तव्यावर असल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना तो करता येत नाही. खीर, मोदक बनविण्याचे भाग्यही अनेकींना मिळत नाही. वर्षभर अंगावर खाकी असते. सणांमध्ये साडी घालण्याची हौसही बंदोबस्ताला हजर असल्याने त्यांना पूर्ण करता येत नाही.
होमगार्डही सेवेला
पोलिसांच्या मदतीला रस्त्यावर सुमारे ६०० होमगार्ड उतरले आहेत. त्यामध्ये १०० महिलांचा समावेश आहे. त्यांनाही २४ तास ड्युटी असल्याने घरी वेळ देता येत नाही. पोलीस आणि होमगार्ड यांचीही अवस्था एकच आहे.