अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : जुळ्या शहरांतील गणेशजींचा महिमा काही औरच आहे. अचलपूर शहरातील ‘बाविशी’, ‘बावन एक्का’, तर परतवाड्यातील ‘डेपोचा गणपती’ भक्तांकडून मान्यताप्राप्त आहेत. डेपोचा गणपती कर्तव्यपूर्तीकडे, तर बाविशीचा गणपती पुत्रप्राप्तीकडे नेतो, अशी मान्यता आहे.अचलपूर शहरातील बाविशीच्या गणपतीची स्थापना १२५ वर्षांपूर्वी नाट्यगृहातील गणेश मंदिरात दादासाहेब पांगारकर, अण्णासाहेब देशपांडे, आप्पासाहेब देशमुखांनी केली. संगमरवरी दगडाची पूर्ण उजव्या सोंडेची ही गणेशजीची मूर्ती १८९४ मध्ये मध्य प्रदेशातील जबलपूरवरून अचलपूरला पोहोचायला तब्बल ४० दिवस लागले. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दक्षिण भारतीय शास्त्रोक्त पद्धतीने केली गेली.परतवाडा शहरातील डेपोचा गणपती स्वयंभू आहे. काळ्या दगडावर कोरलेली एक लहान गणेशमूर्ती शेंदूरवर्णी आहे. शेकडो वर्षांपूर्वी सेतुलालजी अग्रवाल यांना शेतातील वड व पिंपळाच्या झाडालगत उत्खननात ही गणेशमूर्ती आढळून आली. त्यांनी त्याच ठिकाणी एक ओटा बांधून या गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली. आजही त्याच ठिकाणी ती आहे.परतवाडा शहरात इंग्रज सैन्याचे तळ होता. या ठिकाणालगतच वनविभागाचा लाकडाचा मोठा डेपो आहे. आधी इंग्रजांची पलटन म्हणून पलटनचा गणपती व पुढे आज वनविभागाच्या डेपोमुळे डेपोचा गणपती म्हणून ओळख आहे. स्वयंभू व जागृत असलेल्या या डेपोच्या दणपतीची कुमारिकांनी मनोभावे पूजा केल्यास विवाहयोग जुळून येतात, अशी धारणा आहे. चतुर्थीला आणि गणेशोत्सवादरम्यान या ठिकाणी भक्तांची गर्दी उसळते. दर बुधवारीही गर्दी बघायला मिळते. बाविशीच्या दरम्यानचे हे नाट्यमंदिर आज इतिहासजमा झाले आहे. मात्र, अण्णासाहेब देशपांडे यांनी प्राणप्रतिष्ठा केलेली गणेशमूर्ती आजही त्या ठिकाणी विराजमान आहे.