एका पायाने अपंग, ‘राईड तो फाईट विथ कोरोना’ संदेशासाठी भारतभ्रमण
वरूड : तालुक्यातील वाडेगाव येथील गणेशकुमार भोंडे या युवकाने महाराष्ट्र दिनी स्थानिक महात्मा फुले चौकातून कोरोना जनजागृतीकरिता ११ हजार किमी प्रवास करून 'राईड तो फाईट विथ कोरोना'चा संदेश देणार आहेत. विशेष म्हणजे, एका पायाने अपंग असलेल्या गणेशकुमार हे कृत्रिम पायाच्या आधारे सायकलने हा प्रवास करणार आहेत.
गणेशकुमार भोंडे हा फरिदाबाद येथील एका कंपनीत कामाला होता. तेथे काम करीत असताना अचानक एक दिवस अपघात झाला आणि त्यामध्ये एक पाय पूर्णतः निकामी झाल्याने काढून टाकावा लागला. परंतु, काही करण्याची जिद्द आणि चिकाटी स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे कृत्रिम पाय बसविल्यानंतर त्याने सायकलने दिल्ली ते मुंबई प्रवास करून विक्रम केला. आता नव्या ऊर्जेने प्रेरित होऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा प्रचार व्हावा, या उद्देशाने प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर १ मे रोजी सायकलने भारतभ्रमणाचा निर्णय त्याने घेतला व तो अमलात आणला.
स्थानिक महात्मा फुले चौकातून महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आल्यानंतर मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून सायकलिंगला सुरुवात करण्यात आली. यावेळी वरूड सायकलस्वार ग्रुपच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सायकलस्वार ग्रुपचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, बाळा चांगदे, पीयूष खंडेलवाल, तलाठी देवानंद मेश्राम, विदर्भ प्रेस क्लबचे संजय खासबागे, तालुकाध्यक्ष योगेश ठाकरे, शहराध्यक्ष स्वप्निल आजनकर, प्रकाश गडवे आदी उपस्थित होते.
------------
असा राहणार प्रवास
वरूड, अमरावती, नागपूर, बैतुल, भोपाळ, जयपूर, द्वारका, वडोदरा, नाशिक, मुंबई, बंगळुरू, रामेश्वरम्, पुरी बद्रिनाथ आणि इंडिया गेट (दिल्ली) असा ६५ दिवसांचा प्रवास राहणार आहे. यातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंगीकारण्याचा संदेश गणेशकुमार हा देणार आहे.