मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे
फोटो -
पाच क्विंटल होते जमा, नदी-नाले, विहिरींना धोका टाळण्यासाठी खतनिर्मितीचा उपक्रम
मोहन राऊत - धामणगाव रेल्वे : गणेशोत्सवात विघ्नहर्त्याला वाहिलेले हार, बेल, फुले, दुर्वा हे निर्माल्य झाल्यानंतर विहिरीत, नाल्यात टाकून जलप्रदूषणाला हातभार लावला जातो. हा उपद्रव टाळण्यासाठी अमरावती येथील एका स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते दररोज घरोघरी जाऊन तब्बल पाच क्विंटल निर्माल्य गोळा करून त्यावर खतनिर्मितीची प्रक्रिया करतात.
गणेशोत्सवादरम्यान दररोज सार्वजनिक गणेश मंडळात हार, दुर्वा, हळद, गुलाल अर्पण करण्यात येतो. भाविकांची संख्या जेवढी अधिक, तेवढी हार फुलांची संख्याही वाढत जाते. ही फुले व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडल्याने गणेश भक्तांच्याच पायदळी तुडविली जाऊ शकतात. निर्माल्याविषयी जनजागृती अद्यापही झाली नसल्याने दररोज जिल्ह्यात तीनशे क्विंटल हार-फुले विहिरी, नदी-नाल्याच्या पात्रात विसर्जित होतात. अमरावती शहरातील विहिरी यामुळे बुजण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. हे हेरून अमरावती येथे श्री माई निर्माल्य सेवा योजनेंतर्गत निर्माल्य संकलन उपक्रम सुरू केला आहे.
चारचाकी वाहनातून निर्माल्य संकलन अमरावती येथील हरीश वाघ यांनी श्री माई आनंद सेवाश्रम चॅरिटेबल ट्रस्ट (वातोंडा) स्थापन करून श्री माई निर्माल्य सेवा योजना सुरू केली आहे. शहरातील घरोघरी फिरून त्यांनी प्रथम पत्रक वाटली. नंतर कापडी पिशव्या घेऊन निर्माल्य गोळा करण्याची योजना सुरू केली. त्यासाठी स्वतः एक चारचाकी वाहन घेतले. यातून दररोज पाच क्विंटल निर्माल्य जमा करून त्याचा खतनिर्मितीचा प्रयोग सुरू केला आहे. एखाद्याकडून फोन आला की, सेवाभावी वाहन संबंधितांच्या घरी धडकून निर्माल्य जमा केले जाते. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव काळातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
----------
गणेशोत्सव अथवा नवरात्र उत्सवात अधिक निर्माल्य फुले हार दुर्वा घरी जमा होते. ते पायदळी तुडविले जाऊ नये, योग्य विल्हेवाट लागावी, यासाठी हा उपक्रम हाती घेतला. कुणी काहीही देत नाही. दररोज पाच ते सहा क्विंटल निर्माल्य जमा करण्यात येते. खतनिर्मितीसाठी त्याचा वापर केला जातो.
- हरीश वाघ, अध्यक्ष, श्री माई निर्माल्य सेवा योजना, अमरावती