अमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून चोरलेल्या मेंढ्यांची थेट कारमधून परप्रांतात तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व अंजनगाव सुर्जी पोलिसांच्या संयुक्त पथकाने १४ फेब्रुवारी रोजी मध्यप्रदेशमधून अटक केली. त्या टोळीकडून कार व दुचाकी असा एकूण ८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात ही धाडसी कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे पाचही आरोपी राजस्थानातील रहिवासी असून, त्यांना मध्यप्रदेशातील एका गावातून अटक करण्यात आली.
पोलिसांनुसार, राजू हजारी बंजारा (४०, रा. कलमकाकुआ, राजस्थान), महेंदर मंत्रा बंजारा (२६), महेंद्रा चुन्नीलाल बंजारा (२३), श्यामराज परती बंजारा (२६) व राजकुमार बलराम बंजारा (२८, सर्व रा. बोरकाकुआ, राजस्थान अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मेंढ्यांसह जनावरे चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता त्याला आळा घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास करीत होते. तपासात अशा प्रकारचे गुन्हे राजस्थानमधील काहीजण टोळी बनवून ते काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर तपासाची चक्रे फिरविण्यात आली. त्यात चोरटे हे राज्यस्थानमधील कोटा व झालवार जिल्ह्यातील असल्याचे समोर आल्यावर स्थानिक गुन्हे शाखा व अंजनगाव सुर्जी पोलीस यांचे प्रत्येकी एक पथक राजस्थानला रवाना झाले.
नाकाबंदी करून आवळल्या मुसक्या
ते चोरटे आरजे १७ यूए २००१ या कारने राजस्थानवरून मध्यप्रदेशला येत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर पथकाने मध्यप्रदेशातील राजगड येथील पोलिसांच्या मदतीने महामार्गावर नाकाबंदी करून चोरट्यांना अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच त्या टोळीने जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीसह शिरजगाव कसबा, चांदूरबाजार, मोर्शी येथून मेंढ्या चोरी केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार व रेकी करण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे व अनंता हिवराळे, सुनील महात्मे, सय्यद अजमत, नीलेश डांगोरे, अमोल केंद्रे, मंगेश फुकट, सायबरचे सागर धापड, चेतन गुल्हाने, सरिता चौधरी, रितेश वानखडे यांनी केली.