पोलीस सूत्रांनुसार, वलगाव रोडवरील पाकिजा कॉलनी येतील रहिवासी महिलेला फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती तिने स्वीकारल्यानंतर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तिच्याशी अज्ञात व्यक्तीने मैत्री दृढ केली. त्यानंतर विदेशातून गिफ्ट पाठविल्याची बतावणी या व्यक्तीने केली. कस्टम ऑफिसमध्ये ते अडकले असल्याची बतावणी करून वेळोवेळी तिच्याकडून पैसे उकळण्यात आले. १७ जून ते २८ जून या ११ दिवसत्च्या कालावधीत तिच्याकडून १४ लाख ७७ हजार रुपये ऑनलाईन उकळण्यात आले. यादरम्यान कोणतेही पार्सल तिला प्राप्त झाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने सायबर पोलिसांत धाव घेतली. (४४) ७४४८५४७५०२, ८४०९३१०५०७, (९१) ८०९९६६८८६९ या मोबाईल क्रमांकाच्या धारकाविरुद्ध तसेच एचडीएफसी बँक भारत बिजन जमातियाच्या धारकाविरुद्ध भादंविचे कलम ४१९, ४२० सहकलम ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर करीत आहेत.
सोशल मीडियावर मैत्री करून साडेचौदा लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:09 AM