अमरावती : मोबाईल कंपन्यांच्या टाॅवरमधील बॅटरी व टाॅवर कार्ड चोरी करणाऱ्या चौघांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी ही यशस्वी कारवाई केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरली जाणारी महागडी कार जप्त करण्यात आली. आरोपींनी सात गुन्हयांची कबुली दिली आहे.
अ. आरीफ शे.तुराब, (रा. खोमई, मध्यप्रदेश), वसीम शहा लुकमान शहा ( इकबाल कॉलनी, अमरावती), नितीन रामभाऊ श्रीराव व आनंद पतिराम काळे (दोघेही रा. पाळा, ता. मोर्शी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर आरोपींचा एक सहकारी फरार आहे.
जिल्ह्यातील विविध मोबाईल कंपन्यांचे टाॅवरवरून बॅटरी व टावर कार्ड चोरीच्या घटनात वाढ होत असल्याने अशा गुन्हयातील आरोपींचा शोध घेवून ते गुन्हे उघड करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यादरम्यान, १३ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अचलपूर उप विभागात गस्त घालत असताना अ. आरीफ शे तुराब व त्याचे इतर साथीदार हे मोबाईल टाॅवर बॅटरी चोरीचे गुन्हे करित असून सध्या ते गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्याआधारे त्यांनी शिरजगांव कसबा बस स्टॅंडजवळ सापळा रचून चारही आरोपींना अटक केली. ट्रॅप यशस्वी केला.
चोरीचा माल विकणारा फरार
अटक चारही आरोपींनी तिवसा पोलीस ठाण्यात नोंद दोन व कुऱ्हा, चांदूरबाजार, वरूड, मंगरूळ व नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात नोंद अशा प्रत्येकी एक अशा एकुण सात गुन्हयांची कबुली दिली. त्या सर्व चोरीची घटना मोबाईल टॉवरबाबतच्या आहेत. आरोपी हे रेकार्डवरील गुन्हेगार असून त्यांचेवर यापुर्वी सुध्दा चोरीचे गुन्हयांची नोंद आहे. यातील फरार आरोपी हा चोरीच्या गुन्हयातील बॅटरी व कार्ड आरोपींकडून कमी किमतीत विकत घेवून दिल्ली व इतर ठिकाणी विक्रीकरीता घेवून जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींना तिवसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कार्यवाही
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरिक्षक रामेश्वर धोंडगे, उपनिरिक्षक तसलीम शेख, पोलीस अंमलदार दिपक उईके, युवराज मानमोठे, स्वप्नील तंवर, रविंद्र वऱ्हाडे, अजमत, सागर नाठे, सचिन मिश्रा, वृषाली वाळसे, अंजली आरके यांचे पथकाने ही कार्यवाही केली.