अमरावती : येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला राजस्थानी कुटुंबाला विकण्यात आले. एका राजस्थानी व्यक्तीशी बळजबरीने तिचा विवाह लावून देण्यात आला; मात्र दहा दिवसानंतर तिने तेथून पळ काढून अमरावती गाठले. त्यानंतर मानवी तस्करी अर्थात ह्यूमन ट्रॅफिकिंगचा हा धक्कादायक प्रकार उघड झाला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी पाच जणांविरुद्ध अपहरण व मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात एका महिलेसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी मंगळवारी दुपारी याबाबत विस्तृत माहिती दिली.
मुख्य सूत्रधार महिलेसह तिचा पती व प्रियकर असे तिघे फरार असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. संतोष रामधन इंगळे (३४), मुकेश ज्ञानदेव राठोड (४०) व चंदा मुकेश राठोड (३८, सर्व रा. अकोला) अशी अटक आरोपींची नावे आहेत. नवसारी परिसरातील आकाश नामक तरुण हरविल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी २९ जानेवारी रोजी गाडगेनगर ठाण्यात दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास आरंभला. आकाशसह एक अल्पवयीन मुलगीही इंदौरला गेल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांचे एक पथक इंदौरला गेले. येथे तपासात हे प्रकरण मानवी तस्करीचे असून त्यात एक टोळी सक्रिय असल्याचे समोर आले. पोलिस इंदौरला आल्याचे समजताच मुख्य सूत्रधार महिला व तिचा प्रियकर तेथून फरार झाले.
महिलेने दिल्या भूलथापा, रतलामला आकाशही सोबत
दरम्यान, आकाशसोबत गेलेली १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी दोन दिवसांपूर्वी घरी परतल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या मुलीला ठाण्यात बोलावून तिची चौकशी केली. यावेळी तिने आपबिती कथन केली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एका महिलेने आपणास अमरावतीच्या बसस्थानक परिसरातून भूलथापा देऊन रतलाम येथे नेले. आरोपींनी आपल्याला पैशांचे आमिष दाखवून राजस्थानला चार ते पाच लाखांमध्ये विकले. तत्पूर्वी, त्यांनी मध्य प्रदेशातील रतलाम येथे आपले लग्न लावून दिले. त्यानंतर सर्व आरोपी आपल्याला सोडून तेथून निघून गेले. त्यानंतर आपण एक रात्रीच्या वेळी तेथून पळ काढत घर गाठले, असे तिने पोलिसांना सांगितले. रतलाम येथे लग्न लागत असताना आकाश सोबत होता.
आकाशच्या शोधात पोलिस इंदौरला
पीडित मुलीच्या बयाणाच्या आधारावर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. त्यानुसार या टोळीतील संतोष इंगळे, मुकेश राठोड व चंदा राठोड यांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महिलेसह अन्य आरोपी फरार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. दरम्यान, आकाशच्या शोधात एक पथक पुन्हा इंदौरला रवाना झाले आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक महेश इंगोले, इशय खांडे, नीळकंठ गवई, गजानन बरडे, आस्तिक देशमुख, सचिन बोरकर, समीर यांनी केली.