पुढील आठवड्यात एफआयआर : महापालिकेच्या चार संकुलांत अनिमियतताअमरावती : महापालिका बाजार व परवाना विभागाचे तत्कालीन अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी संकुलांत गाळेवाटपात गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांची कुंडली तयार होत आहे. कोट्यवधी रुपयांचा अपहार करणाऱ्या जयस्वाल यांच्यावर पुढील आठवड्यात फौजदारी कारवाई केली जाईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली.संकुलात गाळे वाटपात गैरव्यवहार झाल्याच्या निष्कर्षाप्रत प्रशासन पोहोचले आहे. उपायुक्त चंदन पाटील, सहायक आयुक्त राहुल ओगले यांच्याकडे अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार हे दोन्ही अधिकारी बाजार व परवाना विभागाचे दत्फर घेऊन बसले आहेत. महापालिका संकुलात झालेल्या गैरप्रकाराची माहिती आयुक्त गुडेवार यांना सादर करावी लागणार आहे. गंगाप्रसाद जयस्वाल यांनी तहसीलनजीकच्या खत्री कॉम्प्लेक्समध्ये ३७ गाळेधारकांसोबत परस्पर करारनामे करुन त्यांना मुदतवाढ दिली आहे. यात लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याच्या निष्कर्षाप्रत प्रशासन पोहोचले आहे. मात्र, खत्री कॉम्प्लेक्समध्येच नव्हे तर उर्वरित चार संकुलातही मोठा गैरव्यवहार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आल्यामुळे या सर्वच संकुलाची चौकशी करुन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. एवढेच नव्हे तर गंगाप्रसाद जयस्वाल यांची संपत्ती, पार्श्वभूमी सादर करण्याचे कळविले आहे. जयस्वाल यांच्यावर फौजदारी दाखल झाल्यानंतर त्यांना जामीन मिळू नये, अशी तयारीसुद्धा प्रशासनाने चालविली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविण्यासाठी विधिज्ञ्जांचा सल्ला घेतला जात आहे. एकूणच जयस्वाल यांची कुंडली तयार केली जात आहे. करारनामे बनावट असल्याचे प्रकरणे पुढे आल्याने चौकशी अधिकारीदेखील चक्रावून गेले आहेत. बाजार व परवाना विभागात एकटे जयस्वाल दोषी नसून अन्य अधिकारीसुद्धा गोत्यात येणार असल्याची माहिती आहे. गंगाप्रसाद जयस्वाल यांनी मोठी मोहमाया गोळा केल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सर्वांगीण अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उपायुक्त पाटील, सहायक आयुक्त राहुल ओगले हे त्याअनुषंगाने चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)या संकुलात झाला गैरव्यवहारमहापालिकेच्या चार संकुलांत गंगाप्रसाद जयस्वाल यांनी बदमाशी केल्याचे दिसून आले आहे. यात तहसीलनजीकचे खत्री कॉम्प्लेक्स, राजकमल चौकातील दादासाहेब खापर्डे संकुल, जयस्तंभ चौकातील इंदिरा गांधी प्रियदर्शनी मार्केट व राजापेठ येथील वीर वामनराव जोशी, द्वारकानाथ अरोरा संकुलाचा समावेश आहे.चार संकुलांत अनियमितता झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. चौकशी अहवाल प्राप्त व्हायचा आहे. संकुलात गैरव्यवहार करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निश्चित झाले आहे. केवळ अहवालाची प्रतीक्षा आहे. जयस्वाल यांची संपत्ती सील केली जाईल.- चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका.
गंगाप्रसाद जयस्वाल यांची कुंडली तयार
By admin | Published: June 14, 2015 12:26 AM