परतवाडा (अमरावती) : शहरातील मुख्य असलेल्या गुजरी व सदर बाजार परिसरात गर्दीतून व्यापाऱ्यांना ‘धूम’ स्टाईल धमकावणाऱ्याचा बंदोबस्त करण्याची मागणी व्यापारी स्थानिक नागरिकांनी सोमवारी एका निवेदनाद्वारे केली.
मेळघाटला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील काही गावे व चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी तालुक्यांची मुख्य बाजारपेठ असलेल्या परतवाडा शहरात दिवाळीचे दिवस पाहता खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते. अशात काही युवक मोठ्या प्रमाणात ‘धूम’ स्टाईल वाहने चालविण्यासह व्यापाऱ्यांशी उर्मट आणि शिवराळ भाषेचा वापर करून अश्लील इशारे करीत असल्याचा प्रकार घडत आहे.
सदर बाजार येथे रविवारी प्रतिष्ठित व्यापारी आपल्या सून व नातीसह घरासमोरील ओट्यावर उभे असताना, टवाळखोर दहशत पसरविण्याच्या उद्देशाने ट्रिपलसीट मोटारसायकलवर दाखल झाले. या टवाळखोरांना संबंधित व्यापाऱ्याने हटकले. तेव्हा ते तिथून पुढे सरकले. व्यापारी सून आणि नातीसह बाजार ओळीत निघाले असता. हे टवाळखोर परत त्या व्यापाऱ्याजवळ पोहोचले. तेथे त्यांनी त्यांना दमदाटी केली. लगेच अन्य व्यापारी गोळा आल्याने तीन ते चारच्या संख्येत असलेले हे गुंड प्रवृत्तीचे युवक पळून गेले.
सोमवारी त्या संदर्भात संतोष अग्रवाल यांच्यासह व्यापाऱ्यांनी परतवाडा पोलीस ठाणे गाठून परिसराच्या सुरक्षेसाठी गस्त घालण्याची मागणी केली. यावेळी व्यापारी संघटनेचे अजय अग्रवाल, संतोष नरेडी, ओमप्रकाश अग्रवाल, पवन अग्रवाल, उज्ज्वल अग्रवाल, दीपक वर्मा ५०च्या जवळपास व्यापारी होते. सदर बाजारात पोलिसांची गस्त वाढविण्याबरोबरच अतिरिक्त फिक्स पॉइंट निर्धारित करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली.