प्रदीप भाकरे
अमरावती: बडनेरा रेल्वे स्टेशनकडून गांधी विदयालय रोडने गांजा विक्री करण्याकरीता चार बॅग घेऊन निघालेल्या दोघांच्या शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने मुसक्या आवळल्या. २० ऑक्टोबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून ५ लाख ७४ हजार २०० रुपये किमतीचा २८.३५० किलो गांजा जप्त करण्यात आला.
मोहम्मद अवेस वल्द मोहम्मद आरिफ (२२ वर्ष, रा. टेकडीपुरा, वार्ड नं. ६, मंगरूळपीर जि. वाशिम ह.मु. खदान नाका, मुलानी चौक, अकोला) व इमरान खान वल्द नवाज खान (वय ३० वर्ष रा. लालखडी, अमरावती) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सोमवारी पहाटे जप्त मुद्देमाल व आरोपींना बडनेरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रविवारी रात्री १० च्या सुमारास गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ चे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गांजाबाबत माहिती मिळाली. त्याआधारे गांधी विदयालय येथे सापळा रचण्यात आला. त्यावेळी रेल्वे स्टेशन बडनेराकडून गांधी विदयालयाकडे येत असतांना दोन्ही आरोपींना विचारणा करण्यात आली. त्यांच्या ताब्यातुन २८.३५० किलो गांजा व इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्यांच्याविरूध्द एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर, सागर पाटील, गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट २ चे प्रमुख बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरिक्षक महेश इंगोले व योगेश इंगळे, उपनिरिक्षक संजय वानखडे, अंमलदार दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, आस्तिक देशमुख, अजय मिश्रा, मंगेश शिंदे, संग्राम भोजने, नईम बेग, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, निलेश वंजारी, सागर ठाकरे, संदीप खंडारे यांनी ही कारवाई केली.