परतवाडा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या कडक निर्बंधांच्या आधारे अचलपूर शहरात बाहेरील कोणीही येऊ नये म्हणून, शहराला असलेल्या इतिहासकालीन परकोटाचे दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न अचलपूर पोलिसांनी केला.
यात त्यांच्याकडून केवळ तहसील मागून जाणाऱ्या मार्गावरील खिडकी गेट तेवढे बंद झाले. बंद केलेले हे गेट दीड-दोन तासानंतर उघडले गेले, तर दुल्हा गेटही त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला. पण, ते बंद होऊ शकले नाही.
लॉकडाऊनच्या अनुषंगाने, अचलपूर शहराला असलेल्या परकोटाचे दरवाजे बंद करण्याच्या अचलपूर पोलिसांच्या या प्रयत्नातून मात्र अचलपूरचा इतिहास चर्चेत आला.
अचलपूरचे पहिले नबाब इस्माइलखान यांनी इ. स. १७५८ मध्ये हैदराबादच्या निजामाकडून वऱ्हाडची सुभेदारी मिळवली आणि अचलपूरचा परकोट बांधायला घेतला. किंबहुना ईस्माईलखानने हा परकोट इ. स. १७५८ मध्ये बांधला . अगदी सुख - समृद्धीच्या काळात मजबुतीकडे लक्ष पुरवत तो बांधला गेला.
अचलपूर शहराला असलेल्या या ऐतिहासिक परकोटाच्या भिंतीला पाच ठिकाणी प्रवेशद्वार आहेत. दुल्हा गेट, खिडकी गेट, तोंडगाव गेट, बुंदेलपुरा गेट, हिरापुरा गेट अशी त्यांची नावे आहेत. युद्धादरम्यान किंवा शत्रूंपासून संरक्षण करताना व आणीबाणीच्या काळात हे परकोटाचे दरवाजे तेव्हा बंद केले जायचे. दुसरा कुठलाही इसम अचलपूर शहरात येऊ नये, याकरिता रात्री उशिरा हे सर्व दरवाजे बंद करून शहराला सुरक्षितता प्रदान केली जायची.
अगदी इंग्रजांच्या राजवटीपासून ते स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांपर्यंत हा ऐतिहासिक परकोट व त्याचे दरवाजे शाबूत होते. काही वर्षांपूर्वीपर्यंतही हे दरवाजे लोटल्यानंतर सहज लागत होते. त्या दरवाजांच्या लाकडी फळ्या व ते खरपी दगड सुरक्षित होते. पण, अलीकडे मात्र या परकोटाची आणि दरवाजांची दुर्दशा झाली आहे. दरम्यान, अशातही कोरोनापासून अचलपूर शहर सुरक्षित राहावे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा. या अनुषंगाने अचलपूर पोलिसांनी हे परकोटाचे दरवाजे बंद करण्याचा केलेला प्रयत्न उल्लेखनीय ठरला आहे. अनेक वर्षांनंतरचा हा पहिला प्रयत्न आहे.