- गजानन मोहोड
अमरावती : बेंबळा प्रकल्पाच्या धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने १२ जुलैच्या मध्यरात्री सुरक्षिततेचा उपाय म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाचे काही गेट उघडण्यात आलेत. मात्र, याची पूर्वसूचना जिल्हाधिका-यांना देण्यात आलेली नाही. ही गंभीर व बेजबाबदारपणाची बाब असल्याने संबंधितांनी कर्तव्यात कसूर केल्याची बाब विभागीय आयुक्तांनी गंभीरतेने घेतली. याविषयी आता जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता चौकशी करून शासनाला अहवाल देणार आहेत. मागील आठवड्यात ११ जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यात संततधार पाऊस व बेंबळा प्रकल्पाचे धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली. प्रकल्पातील जलसाठ्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने यवतमाळ सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता व नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचा-यांनी जिल्हाधिकारी कार्यलय किंवा जिल्हा मध्यवर्ती नियंत्रण कक्षास कोणतीही पूर्वसूचना न देता बेंबळा प्रकल्पाची १० गेट १२ जुलैच्या मध्यरात्री उघडली. यामुळे नदीपात्र अचानक दुथडी भरून वाहू लागले. सुदैवाने कोणतीही जिवित व वित्त हानी झाली नसली तरी यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात न आल्यामुळे नागरिक बेसावध होते. ही बाब यवतमाळचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी गंभीरतेने घेतली. अधीक्षक अभियंतासह यवतमाळ सिंचन मंडळाचे अधिकारी व कर्मचा-यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळेच जिल्हाधिका-यांनी संबंधिताना १३ जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले. माध्यम प्रतिनिधींनी जिल्हाधिका-यांना विचारणा केल्यानंतर बेंबळा प्रकल्पाची १० गेट उघडण्यात आल्याची बाब उघडकीस आली. ही बाब अंत्यत गंभीर असून, संबंधितांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळेच नदीकाठच्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर चौकशी करणार आहेत.
अधीक्षक अभियंत्यांना माहीत होती बाबजिल्हाधिकारी राजेश देशमुख हे ११ जुलै रोजी स्वत: जिल्हा मध्यवर्ती नियंत्रण कक्षात उपस्थित होते. अधीक्षक अभियंता यांना बेंबळा प्रकल्पाची १० गेट उघडल्याची बाब माहीत असतानासुद्धा त्यांनी जिल्हा नियंत्रण कक्षास याची कल्पना दिली नाही. १२ जुलै रोजी जिल्हाधिका-यांनी विचारणा केली केली असता त्यांनी प्रकल्पाची गेट उघडल्याचे मान्य केले. यावरून अधीक्षक अभियंता व त्यांचे अधिनस्त अधिकारी, कर्मचा-यांनी कामात हयगय केल्याची बाब स्पष्ट झाली.
जिल्हाधिका-यांशी यासंदर्भात संवाद झाला. ११ जुलै रोजी बेंबळा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने १० गेट उघडण्यात आली. रात्रीच्या सुमारास धरणाची गेट उघडत नाहीत. याविषयीची सूचना जिल्हा नियंत्रण कक्षास देण्यात आलेली नव्हती. मात्र, याबाबत हूटर (सायरण) वाजविण्यात आला होता. कर्तव्यात हयगय केल्याप्रकरणी चौकशी करण्यात येऊन शासनाला अहवाल सादर करण्यात येईल.- रवींद्र लांडेकर,मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग