'पिंगा ग पोरी पिंगा'ची धम्माल : ज्ञानेश्वर मेश्राम यांची बहारदार गीते सादरअमरावती : जाणता राजा वेलफेअर सोसायटीच्यावतीने आयोजित 'स्वर महाराष्ट्रा'चा या कार्यक्रमात अमरावतीची सुपुत्री सारेगमाची मराठमोळ महागायिका वैशाली माडे हिचा सुधाताई वैद्य यांच्या हस्ते सन्मानपत्र व साडीचा अहेर देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बाजीराव मस्तानी या चित्रपटात तिने गायिलेले पिंगा ग पोरी पिंगा हे गीत सादर करताच रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सत्यम शिवम सुंदरम, हवा के झोकें आज , एक राधा एक मिरा, मै तनु समझावा आदी बहारदार गीतांचे सादरीकरण वैशाली माडेने केले. रविवारी येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात हजारो अंबानगरीतील रसिकांनी हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी आयोजकांनी भव्य व्यासपीठ तयार केले होते.अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमात सरस गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांना सारेगामा फेम ज्ञानेश्वर मेश्राम यांनी विठल्ला कोणता झेंडा घेऊ हाती हे गीत सादर करून रसिकांची दाद मिळविली. यावेळी विठू माऊलींचे अनेक गीतांचे सादरीकरण करून जणूकाही अख्खी पढंरी अंबानगरीत अवतरल्याचा भास होत होता. देवा तुझ्या नावाचं रे येड लागलं या गीताला दाद मिळाली. कार्यक्रम अंतिम टप्प्यात आल्यानंतर वैशालीने 'होटो पे एसी बात मै, दबा के चली आई' हे गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. चित्रपट पार्श्वगायिका सावनी रवींद्र, प्रसन्नजित कोसंबी यांनी हिंदी-मराठी चित्रपटातील अनेक बहारदार गीते सादर करून श्रोत्यांना खिळवून ठेवले. यावेळी श्रोत्यांनाही थिरकण्याचा मोह आवरता आला नाही. ४० वर निष्णात कलावंत, आधुनिक व्यावसायिक वाद्यवृंद, आकर्षक रोषणाई, अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था हे या कार्यक्रमाचे वैशिष्टे ठरले. व्यासपीठावर विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, संत गाडगेबाबा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु विलास सपकाळ, सुधाताई वैद्य, नगरसेवक दिनेश बूब आदी उपस्थित होते. जानता राजा वेलफेअर सोसायटीचे सोमेश्वर पुसदकर, माधुरी चेंडके, डॉ. प्रफुल्ल कडू, चंद्रकांत कलोती, दिग्विजय देशमुख, विजय ढोले, सचिन जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन वैशाली माडे, ज्ञानेश्वर मेश्राम, सावणी रवींद्र, प्रसन्नजित कोसंबी, प्रकाश वाडकर यांचा गौरव करण्यात आला. प्रसन्नजित कोसंबी यांनी सादर केलेल्या 'एक राधा एक मीरा' या गीताने सर्वांची मने जिकंली. लता मंगेश्कर, किशोर कुमार, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी यांच्यासोबत मूळ गाण्यात साथ संगत करणाऱ्या अनेक वाद्य कलावंतानी या कार्यक्रमात अप्रतिम साथ दिली. ४० वादक कलांवतांची एकत्रितपणे उपस्थिीत हा पहिलाच प्रयोग होता. 'जय जय महाराष्ट्र माझा' या गौरव गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे निवेदन प्रकाश वाडकर यांनी केले. यावेळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री, प्रभाकरराव वैद्य यांचीही उपस्थिती होती. यावेळी अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, व विविध क्षेत्रातील रसिक उपस्थिीत होते. (प्रतिनिधी)हा माझा सत्कार नसून अंबानगरीच्या मुलीचा सन्मान मी तुमच्यामुळे घडली. अंबानगरीतील नागरिकांच्या आशीर्वादामुळेच मला हे यश संपादन करता आले. जाणता राजा वेलफेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला हा सत्कार केवळ माझा नसून अंबानगरीच्या सुपुत्रीचा व अमरावतीकरांचा तो खरा सन्मान असल्याची भावना गायिका वैशाली माडे यांनी व्यक्त केली. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची मला यानंतरही गरज राहणार आहे, असेही ती म्हणाली.
मराठमोळी गायिका वैशाली माडेचा अंबानगरीत गौरव
By admin | Published: May 03, 2016 12:26 AM