अमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासनाने गर्दी टाळण्याकरिता आमसभा ऑनलाईन घेतल्या. मात्र, दुसरी लाट येण्यापूर्वी ऑफलाईन सभा घेण्यात आल्या. परंतु संचारबंदीत याला मनाई करण्यात आली होती. आता मात्र, अनलॉक झाल्यानंतरही तसे आदेश न आल्याने २१ जून रोजी होऊ घातलेली आमसभा ऑनलाईन की ऑफलाईन, याबाबत स्पष्ट नसल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे.
पूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्व सभा आतापर्यंत ऑफलाईन घेण्यात आल्या. अशातच काही विषय समित्यांच्या सभा ऑफलाईन पद्धतीने, तर काही ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या. मात्र, एक फेब्रुवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर अद्याप सर्वसाधारण सभा झाली नाही. २१ जून दरम्यान सर्वसाधारण सभा घेण्याचे प्रस्तावीत आहे. मात्र ६ जून पासून जिल्ह्यातला कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक लाॅकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची आगामी होवू घातलेली सर्वसाधारण सभा ऑनलाइन घ्यायची की ऑफलाईन घ्यायची याविषयी गोंधळ सुरू आहे. अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता या सभेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी सभा ऑफलाईन घेण्याचा निर्णय झाल्यास बहुप्रतीक्षेनंतर झेडपी सदस्यांना एकत्र येण्याची संधी उपलब्ध होऊन आपापल्या सर्कलमधील मुद्दे प्रत्यक्ष उपस्थित राहून मांडता येऊ शकणार आहे.